व्ही शांताराम ते ओम पुरी व्हाया संजय लीला भन्साळी : कुटुंबाचा 'बाणेदार' प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 09:48 PM2018-04-21T21:48:40+5:302018-04-21T21:53:45+5:30
पुण्यातल्या बाणेदार कुटुंबातील सलग तिसरी पिढी एफटीआयआयमध्ये कार्यरत आहे. व्ही शांताराम ते ओम पुरी आणि अगदी सध्याच्या संजय लीला भन्साळीपर्यंतच्या साऱ्यांना काम करताना आणि काही प्रमाणात घडताना त्यांनी बघितले आहे.
पुणे : कपूर, खान, बच्चन कुटुंब अभिनय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्याचे म्हटले जाते. इतकेच काय तर त्यांचे कुटुंबाचे फोटोही मोठ्या उत्सुकतेने बघितले जातात. याच रांगेत बसणाऱ्या पुण्यातल्या बाणेदार कुटुंबातील सलग तिसरी पिढी एफटीआयआयमध्ये कार्यरत आहे. व्ही शांताराम ते ओम पुरी आणि अगदी सध्याच्या संजय लीला भन्साळीपर्यंतच्या साऱ्यांना काम करताना आणि काही प्रमाणात घडताना त्यांनी बघितले आहे.
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेची (एफटीआयआय) स्थापना १९६० साली करण्यात आली. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म कंपनीच्या जागेवर उभी राहिली असून त्यात बाणेदार कुटुंबातील हुसेन मेहमूद बाणेदार वाहनचालक म्हणून कामाला होते. त्याचा मुलगा रसूल यांनी प्रभातच्या जागी सुरु झालेल्या एफटीआयआयमध्ये वाहनचालकाचे काम केले. आता तिसऱ्या पिढीत रसूल यांचा मुलगा याकूब हे देखील एफटीआयआयमध्ये काम करत आहेत. त्यामुळे गेले तीन पिढ्या हे कुटुंब सिनेक्षेत्राशी जोडले गेले असून या तिघांनीही 'कमी तिथे आम्ही' अशा स्वरूपाची कामे केली आहेत.
हुसेन यांच्या कामावर प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर इतके खुश झाले की त्याकाळात त्यांनी हुसेन यांना ओपेल ही चारचाकी गाडी भेट दिली. पुढे काही काळात प्रभात कंपनी संपुष्टात आल्यावर बाणेदार कुटूंबाने एफटीआयआयची साथ सोडली नाही. तिथे प्रॉडक्शन विभागात कामाला असलेल्या रसूल यांनी अनेक तारे-तारकांना एफटीआयआयमध्ये जवळून बघितले. प्रसिद्ध गायक शैलेंद्र सिंग यांचा आवाज ऐकून त्यांना अभिनेता नाही तर गायक होण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्यांचा हा सल्ला ऐकून गायक झालेले सिंग स्वतः त्यांचे आभार मानण्यासाठी आल्याची आठवण त्यांनी सांगितली.
आजही रसूल यांना भेटल्याशिवाय शत्रुघ्न सिन्हा एफटीआयआयबाहेर जात नाही, शबाना आझमी त्यांना घरच्यासारख्या असून पुण्यात आल्या की आवर्जून घरी बाणेदार यांच्या घरी हजेरी लावतात. तिसऱ्या पिढीतले याकूब हेदेखील एफटीआयआयमध्ये कार्यरत असून काही चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे. आज हे कुटुंब प्रभात रस्त्यावर एफटीआयआय क्वार्टरमध्ये राहत असून त्यांच्याकडे लाखोंची संपत्ती नसली तरी जगाला माहिती नसणाऱ्या अनेक तारे-तारकांच्या असंख्य आठवणी आहेत हे मात्र नक्की !