वास्तुशास्त्र : रविराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:55+5:302021-05-22T04:10:55+5:30

डॉ. रविराज अहिरराव संस्थापक संचालक वास्तुरविराज समूह मित्रहो, सध्याचा काळ कोरोना महामारीमुळे अत्यंत बिकट झाला आहे. प्रत्येक व्यक्ती धास्तावली ...

Vaastu Shastra: Raviraj | वास्तुशास्त्र : रविराज

वास्तुशास्त्र : रविराज

googlenewsNext

डॉ. रविराज अहिरराव

संस्थापक संचालक

वास्तुरविराज समूह

मित्रहो, सध्याचा काळ कोरोना महामारीमुळे अत्यंत बिकट झाला आहे. प्रत्येक व्यक्ती धास्तावली आहे. अशा परिस्थितीत एखादं धाडसी पाऊल उचलायला कोणीही सहजासहजी तयार नाही. परंतु, ज्यांना नवीन घर घ्यायचं आहे आणि सुदैवाने तुमची अर्थव्यवस्था तुम्हाला साध्य करायला अनुकूल असेल तर तुम्ही नक्की हे पाऊल उचला. कारण, सध्या प्रॉपर्टी रेट आणि होम लोनचा व्याजदर या दोन्ही गोष्टीच्या दृष्टिकोनातून ही सुवर्णसंधीच आहे.

मग प्रश्न निर्माण होतो नवीन वास्तू घेताना वास्तुशास्त्र का पाहायचं? याबद्दल शेकडो कारणे देता येतील, पण त्यातील काही महत्त्वाची मी आज येथे तुम्हाला देत आहे.

१) एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तुमचं मन रमत, खुलत आणि प्रसन्न होतं तर काही वास्तूमध्ये केव्हा एकदा इथून बाहेर पडतोय, अशी अवस्था होते हाच वास्तुशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे.

२) प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता तयार होते, मन आणि शरीर उत्साहाने उत्कृष्ट दर्जाचे काम करते. परिणामी खूप चांगले यश आणि भरपूर प्रगती साध्य करता येते आणि हे केवळ वास्तुशास्त्रयुक्त वास्तूमध्येच सहजपणे घडते.

३) नवीन वास्तूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रगतीच्या नवनवीन संधी आणि आर्थिक उन्नती मोठ्या प्रमाणावर हवी असेल तर उत्तर दिशेचा प्रवेशद्वार निवडल्यास हे सहजपणे शक्य होते. वास्तुशास्त्रानुसार विविध दिशांमध्ये सात ठिकाणी लाभदायी प्रवेशद्वार प्राप्त होऊ शकतात.

४) उत्तर ते पूर्व भागामध्ये जर जास्तीत जास्त खिडक्या मोकळी जागा आणि सकाळचा सूर्यप्रकाश यायला उत्कृष्ट वाव असेल तर आरोग्य चांगले राहण्यास तथा कल्पकता आणि तल्लख बुद्धी वेगाने मार्गक्रमण करण्यास उद्युक्त करू शकते.

५) सुखी वैवाहिक जीवन तथा उत्कृष्ट व्यावसायिक प्रगतीसाठी गृहस्वामी आणि स्वामिनी या दोघांची वैचारिक स्पष्टता व नवनवीन संकल्पना निर्माण तथा स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढविण्यासाठी ईशान्य भागातील प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम, देवघर या माध्यमातून सहजपणे निर्माण करता येते. पण जर का या ठिकाणी टॉयलेट, किचन, बेडरूम किंवा कट आल्यास शैक्षणिक, आर्थिक तथा आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात.

६) सुखी कुटुंबासाठी त्या घरातील गृहस्वामी आणि स्वामिनी हे शारीरिक-मानसिक तथा सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असणे हे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी आग्नेय दिशेतील किचन हे त्या घराचे स्त्री-शक्ती केंद्र आणि नैर्ऋत्य दिशेतील मास्टर बेडरूम पुरुष-शक्ती केंद्र सुदृढ करते.

७) आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या करिअरचा आलेख चढता-प्रगतिशील -स्थैर्य आणि सन्मान प्राप्त करून देणारा असण्यासाठी उत्तर दिशा तथा नैर्ऋत्य दिशेतील वास्तुरचना खूप मोठा हातभार लावत असते.

८) आपल्या आयुष्यातील प्रत्येक काम शेवटच्या टप्प्यात जाऊन अडकणे, रेंगाळणे, हातातोंडाशी आलेला घास सातत्याने हिरावून घेतला जाणे, घरामध्ये सतत तणावयुक्त वातावरण असणे, चांगली मेहनत व प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश न मिळणे तथा आजारपणाचे निदान सहजपणे होत नसल्यास देवघराच्या स्थानाची दिशा चुकली असण्याचा संकेत जाणवतो. म्हणून देवघर नेहमी ईशान्य भागात करता येण्यासारखी गृहरचना अपेक्षित आहे.

९) सध्याच्या स्पर्धात्मक युगात जीवन तणावमुक्त तथा निराशावादी होऊ नये म्हणजेच स्ट्रेस आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी वास्तुची ईशान्य, दक्षिण-नैर्ऋत्य व पश्चिम-वायव्य दिशा वास्तुदोष मुक्त असणे अत्यावश्यक असते.

१०) नवीन वास्तू खरेदी करताना आपण लाखो करोडो रुपये गुंतवणूक करताना त्यातील संभाव्य धोके ओळखणे तथा आपल्या गुंतवणुकीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त करण्यासाठी निष्णात वास्तुतज्ज्ञाचा सल्ला घेऊनच वास्तुची निवड करावी.

११) सध्या वास्तुशास्त्र प्रमाणित गृहप्रकल्प बाजारात उपलब्ध होत आहेत तथा या संपूर्ण प्रकल्पांचे आर्किटेक्चरल डिझाइन वास्तूप्रमाणे करणे हेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर शक्य झाले आहे त्यामुळे अशा प्रकल्पांची माहिती मिळविणे तथा खात्री करून घेणे हे अत्यावश्यक आहे. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणे कदाचित धोकादायक ठरू शकते.

थोडक्यात, आपल्या वास्तुचा ईशान्य भाग पैसा, संधी, आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती आणून देत असतो तर आग्नेय भाग तुमच्या आलेल्या संधीच किंवा पैशाचं सोनं करून देतो. दिरंगाई आणि अडथळे दूर करून आर्थिक चलनवलन वाढवतो. तसेच नैर्ऋत्य दिशेतील वास्तुरचना आपल्या आयुष्याला स्थैर्य, समृद्धीला बरकत, नेतृत्वगुणांची वाढ तथा सतर्कतेचा मंत्र देत असते. तसेच आपण करीत असलेल्या प्रत्येक कामामधून बचत गुंतवणूक आणि फायदा कसा होईल, याबाबत काळजी घेत असते. वायव्य भाग हा वास्तुमधील लोकांमध्ये सुसंवाद तथा प्रेमळ संबंध विकसित करण्यात मदत करते.

वास्तुचा मध्य भाग म्हणजेच ब्रह्मतत्व हे वजन विरहित आणि मोकळे ठेवल्याने आकाश तत्वाच्या माध्यमातून वास्तुमधील सर्वांना एकत्रितपणे काम करण्याची प्रवृत्ती विकसित करते.

तुम्ही घेत असलेली वास्तू 100% वास्तुशास्त्राप्रमाणे असणे शक्य नाही, तथा तुम्ही अगोदरच वास्तू घेतलेली असेल तर व्यथित होण्याची गरज नाही. कारण भारतीय वास्तुशास्त्रामध्ये विना-तोडफोड उपाययोजनांच्या माध्यमातून वास्तु अधिकाअधिक दोषमुक्त करता येऊ शकते. वास्तूचा आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर प्रभाव असल्याने वास्तुची निवड वास्तूची अंतर्गत रचना त्यातील रंग संगती व वास्तु दोष निवारण केल्याने संभाव्य धोके तथा त्रास कमी करता येऊ शकतो.

Web Title: Vaastu Shastra: Raviraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.