वाटाणा उत्पादक शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:40 AM2017-07-29T05:40:20+5:302017-07-29T05:40:32+5:30
पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले असून, पुरंदरच्या पूर्व भागात पिसर्वे, पारगाव, राजुरी, नायगाव, रिसे-पिसे आदी भागात पावसाने हुलकावणी दिली आहे.
नारायणपूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले असून, पुरंदरच्या पूर्व भागात पिसर्वे, पारगाव, राजुरी, नायगाव, रिसे-पिसे आदी भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकºयांनी पिकांच्या पेरण्याच केल्या नाहीत. यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
यावर्षी चांगला पाऊस येईल, धान्य मिळेल, रोगराई कमी होईल भाकणुकीमध्ये सांगण्यात आले होते. त्यामुळे शेतकरीवर्गाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. या आशेने अनेक शेतकºयांनी खरीप हंगामाची जोरात तयारी केली होती. मार्च महिन्यात संपूर्ण देशात शेतकºयांनी कर्जमाफी लावून धरली असताना पाऊस चांगला पडेल, अशी भविष्यवाणी ऐकल्याने पुरंदर तालुक्यातील शेतकºयांनी मात्र कर्जमाफीऐवजी स्वत: कर्ज काढून बँकेत कर्ज भरले.
३१ मार्चपूर्वीच शेतकºयांनी आपला सातबारावरील बोजा कमी करून पुन्हा कर्ज काढले. शेतीची मशागत करून बी-बियाणे, खते, औषधे घेतली; मात्र पुन्हा कर्ज होऊनही हातात काहीच पडत नाही, अशी चिन्हे दिसत असल्याने यावर्षीसुद्धा पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तसेच शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे.
सध्या अनेक ठिकाणी खुरपणी सुरू आहे; मात्र त्यानंतर सलग पुढील नक्षत्रांमध्ये पावसाने फारसी प्रगती केली नाही. त्यामुळे उगवून आलेले वाटाणा पीक सर्वत्र धोक्याची घंटा मोजत आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील महत्त्वाची असणारी बाजरी, भुईमूग, इतर कडधान्ये ही सर्वच पिके अडचणीत आली आहेत. ज्या विहिरींना बºयापैकी पाणी आहे, त्या शेतकºयांकडे पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर संच आहे. ते शेतकरी पाऊस नसल्याने किमान स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र ज्यांच्याकडे काहीच व्यवस्था नाही ते शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. तसेच सध्याच्या स्थितीमध्ये पावसाने जास्त ताण दिल्यास हातामध्ये आलेली सर्वच पिके नष्ट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
...तर पीक फुलोºयात असते
दरवर्षी याच दिवसात वाटाणा पिकांना फुले आलेली असतात. तर काही ठिकाणी वाटाणा पिकाला शेंगा येऊन दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. मात्र, या वर्षी पावसाने मोठा ताण दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे.
मागील वर्षी वाटाण्याला अजिबात बाजारभाव चांगला मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी घरीच बियाणे तयार केले. तसेच दरवर्षीपेक्षा यावर्षी बियाणालाही बाजारभाव कमी असल्याने प्रत्येक शेतकºयाने ४० किलोची एक पिशवी याप्रमाणे किमान २ ते ३ पिशव्या बियाणे पेरले आहे.
साहजिकच पीक जोमात येऊन बाजारभाव मिळाल्यास पैसेही चांगले होतील. मात्र पावसाने ताण दिल्याने सर्व शक्यतांवर पाणी पडले आहे.