महापुरामुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 09:23 PM2019-08-09T21:23:58+5:302019-08-09T22:38:38+5:30

पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

Vacation of all Government Offices in Pune cancelled due to floods | महापुरामुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द   

महापुरामुळे पुण्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द   

Next
ठळक मुद्देपूरग्रस्तांना कपडे, पाणी, मेणबत्तीची  गरज   नागरिकांनी जुने नव्हे नवीन कपडे मदत म्हणून द्यावेत : प्रशासनाचे आव्हान 

पुणे : कोल्हापूर सांगली जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरीकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यालये पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

शिवाय पूरग्रस्तांना सध्या बाटलीबंद पाणी, मेणबत्ती-काडीपेटी, सुके खाद्यपदार्थ आणि कपड्यांची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी या वस्तू पुणे रल्वे स्थानका जवळील विभागीय आयुक्त कार्यालयातील (कौन्सिल हॉल) मदत कक्षात द्याव्यात. नागरिकांनी मदत म्हणून जुने कपडे देऊ नयेत. द्यायचे असल्यास नवीन कपडेच द्यावेत असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी  केले. 
सांगली आणि कोल्हापूरातील पूर स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती अजूनही कायम आहे. कोल्हापूरातील पूर पातळी दोन फुटांनी, तर सांगलीतील ३ इंचांनी कमी झाली आहे. पाणी हळूहळू ओसरत आहे. मात्र, अजूनही पुणे बेंगळुरु आणि बेळगावीहून कोल्हापूरकडे येणारा महामार्ग बंद आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पाणी वितरण व्यवस्था ठप्प पडल्याने येथील नागरिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी सांगलीला १२ हजार लिटर पाण्याच्या बाटल्या आणि एक ट्रक बिस्कीटचे पुडे पोचविले. शनिवारी देखील १ हजार पाण्याचे बॉक्स पोचविण्यात येणार आहेत. 
या बाबत माहिती देताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुराचे पाणी ओसरल्यानंतर तेथील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासेल. त्यामुळे पाणी वितरण प्रणाली सुरु करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. दरम्यानच्या काळात त्यांना पिण्याचे बाटलीबंद पाणी पुरविण्यात येईल. या शिवाय सुके अन्नपदार्थ आणि आवश्यक औषधांचा पुरवठा देखील करण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणारे रस्ते अजूनही बंद आहेत. मात्र, रस्त्यावरील पाणी ओसरल्यानंतर पेट्रोल, डिझेल टँकर, गॅस सिलिंडर आणि अन्नधान्याच्या गाड्यांनाच कोल्हापूरला सोडण्यात येईल. 


या वस्तू मदत म्हणून स्वीकारणार...
बिस्कीट, न्यूडल्स, चहा पावडर, टूथपेस्ट-ब्रश, साबण, पाण्याच्या बाटल्या, मेणबत्ती, काडेपेटी, टॉर्च, ब्लँकेट, सतरंजी, टॉवेल, साडी, लहानमुलांची कपडे, मोठ्या माणसांची कपडे आणि आंतरवस्त्र. नागरिकांनी दिलेले जुने कपडे स्वीकारण्यात येणार नाहीत. कपडे द्यायचे असल्यास नवीन देण्यात यावेत, असे आवहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. वेदनाशामक, ताप-सर्दी-खोकला आणि व्हेपोरब ही औषधे स्वीकारले जातील. तर,रोख रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता फंडाला देण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. 


पुणे-बेंगळुरु महामार्ग बंद असल्याने १७ ते १८ हजार वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत. रस्ते वाहतूक सुरु झाल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आणि धान्याची वाहने कोल्हापूरला सोडण्यात येतील. त्यामुळे रस्ता सुरु झाल्याचे समजल्यावर वाहने रस्त्यावरआणू नयेत. अत्यावश्यक सुविधा पोचविणारी वाहने गेल्याची सूचना मिळाल्यानंतर वाहने या रस्त्यावर आणावीत. 
डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे 

Web Title: Vacation of all Government Offices in Pune cancelled due to floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.