सुटीत पावले प्राणिसंग्रहालयाकडे
By admin | Published: April 26, 2017 04:01 AM2017-04-26T04:01:48+5:302017-04-26T04:01:48+5:30
शांळाना सुट्या लागल्याने, सिंहाच्या जोडीच्या आगमनाने तसेच वन्यजीवांच्या संख्येत कात्रज येथील
धनकवडी : शांळाना सुट्या लागल्याने, सिंहाच्या जोडीच्या आगमनाने तसेच वन्यजीवांच्या संख्येत कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. येथील थंडगार व आल्हाददायक वातावरण, विविध प्रकारची हरणे, वाघ, सिंह पाहायला मिळत असल्याने बालचमू याकडे धमाल मस्तीची अभ्यास सहल म्हणूनदेखील पाहत आहेत.
प्राणिसंग्रहालयात तेजस व सुब्बीच्या रूपाने सिंहाची जोडी प्रेक्षकांना पाहण्यासाठी नुकतीच खुली करण्यात आली. त्या दिवसापासून गर्दीमध्ये वाढ होत आहे. सिंहांना प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुले केल्याच्या पहिल्याच दिवशी ९,९५० इतकी प्रचंड गर्दी, तर पुढच्याच रविवारी १६ एप्रिल रोजी १३,७६६ व २३ एप्रिल रोजी १६,६२५ पर्यटकांनी भेट दिली. सन २०१६-१७मध्ये १७,४६,३५८ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून प्राणिसंग्रहालयाला ४,११,२६,७६० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
या प्राणिसंग्रहालयात २० सस्तन, सरपटणारे ३० व पक्ष्यांच्या १५ प्रजाती असे एकूण ६५ प्रकारच्या प्रजातींचे ४२० प्राणी व पक्षी पाहायला उपलब्ध आहेत. दोन वर्षांपूर्वी दोन पांढरे वाघ व या महिन्यात सिंहांची जोडी, तर काही महिन्यांतच जिराफदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)