शहरात शंभर दिवसात ७ लाख ७० हजार जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:21+5:302021-04-26T04:10:21+5:30
* शहरात लसीकरणाच्या शंभर दिवसांत ७ लाख ७० हजार जणांना लस * लोकसंख्येच्या ६८ टक्के जणांना ...
* शहरात लसीकरणाच्या शंभर दिवसांत ७ लाख ७० हजार जणांना लस
* लोकसंख्येच्या ६८ टक्के जणांना द्यावयाची आहे लस
* आजपर्यंत शहरात सुमारे १५ टक्के जणांना लसीकरण
निलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम सुरू होऊन रविवारी (दि.२५ एप्रिल,२०२१) शंभर दिवस पूर्ण झाले़ या शंभर दिवसांत पुणे शहरात ७ लाख ७० हजार ३८३ जणांना लस दिली आहे. यातील १ लाख ३३ हजार, ९०९ जणांचे दोन डोस पूर्ण झाले आहे़ कोरोना विषाणूपासून सुरक्षाकवच तयार करण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा दुवा असून, शहरातील एकूण लोकसंख्येच्या ६८ टक्के लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लस देणे हे महापालिकेसमोर आव्हान आहे़
शहरातील (पुणे महापालिका हद्दीतील) लोकसंख्या ४० लाखांच्या आसपास गृहीत, तरी १६ जानेवारीपासून आजपर्यंत सुमारे १५ टक्के जणांचे लसीकरण झाले आहे़ तर दुसरीकडे संपूर्ण देशात आजमितीला एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २ टक्के लोकसंख्येला लस दिली गेली आहे़ त्यामुळे पुण्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू असून, या लसीकरणाचा परिणामही शहरात आता सकारात्मक दिसून येऊ लागला आहे़ शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे़ अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण झाल्यावर कोरोना संसर्ग झाला, तरी कोरोनामुळे प्रकृती गंभीर होण्याची परिस्थिती ९९ टक्क्यांनी कमी होणार आहे़
साधारणत: एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येचे लसीकरण झाल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम संबंधित शहरात दिसून येतो, असे निरीक्षण साथीच्या आजारांमध्ये नोंदविण्यात आले आहे़ त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अधिकाधिक लसीकरण झाल्यावर शहरात कोरोना सुरक्षाकवच निर्माण होऊ शकेल़
सध्या शहरात १८२ लसीकरण केंद्रांव्दारे लस दिली जात असून, टप्प्या-टप्प्याने लसीकरण केंद्रात वाढ होत आहे़ १ मार्च पासून ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यावर शहरातील लसीकरणाचा आकडा झपाट्याने वाढला़ लस पुरवठा वेळेत न झाल्याने मध्यंतरीचे काही दिवस व गेल्या दोन दिवसातील कमी झालेले लसीकरण वगळता, शहरात सर्वच लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसींनुसार १०० टक्के लसीकरण झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे़
शहरात गेल्या १०० दिवसांत ७ लाख ७० हजार जणांना लस देण्यात आली असून, १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे शहरातील लसीकरणांची संख्या वाढविण्याचे महापालिकेचे प्रयत्न असून, लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणे व शहरासाठी कोरोना सुरक्षा कवच तयार करणे हे आमचे ध्येय असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले़
--
चौकट १
शंभर दिवसांतील लसीकरणाचा आढावा
१६ जानेवारी ते २५ एप्रिल
* आरोग्य कर्मचारी :
पहिला डोस : ५७ हजार ८५७ : दुसरा डोस : ४१ हजार ८९२
* फ्रं ट लाईन वर्कर :
पहिला डोस : ६२ हजार २५७ : दुसरा डोस : १७ हजार १०६
* ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक :
पहिला डोस : २ लाख ६२ हजार ७०७ : दुसरा डोस : ५७ हजार ४१८
* ४५ वर्षांवरील नागरिक :
पहिला डोस : २ लाख ५३ हजार ६५३ : दुसरा डोस : १७ हजार ४९३
---
एकूण लसीकरण :- ७ लाख ७० हजार ३८३़
---
कोट
अधिकाधिक लसीकरण करणे हे ध्येय
शहरात १८ वर्षे वयापेक्षा अधिकची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या ६७ टक्के इतकी आहे. या सर्वांना लवकरात लवकर लसीकरण करणे हे आमचे ध्येय आहे़ सध्या शहरात १८२ लसीकरण केंद्र कार्यरत असून, १ मेपासून यात आणखी वाढ करण्यात येईल. पुणे शहराला लसीकरणाच्या १०० दिवसांमध्ये ८ लाख २७ हजार ९७० लसीचे डोस प्राप्त झाले आहेत़ यामध्ये कोविशिल्डचे ७ लाख १९ हजार ८२० तर कोव्हॅक्सिनचे १ लाख ८ हजार १५० डोस प्राप्त झाले आहेत़
- डॉ. वैषाली जाधव, मुख्य लसीकरण अधिकारी तथा सहाय्यक आरोग्य प्रमुख पुणे मनपा