महापौर साहेब आम्हालाही लस द्या, खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:08 PM2021-03-17T17:08:52+5:302021-03-17T19:04:34+5:30
शिक्षकांच्या वतीने नगरसेवक आदित्य माळवे यांचे महापौरांना पत्र
पुणे: पुणे शहरात लसीकरण सुरू झाल्यावर पहिल्या दोन टप्प्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या आरोग्य - महानगरपालिका कर्मचारी, कचरावेचक अशा सर्वांना प्राधान्य देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आम्हालाही लस द्या अशी मागणी खासगी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी केली आहे. पुणे महापालिकेचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी शिक्षकांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत पत्र दिले.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याचबरोबर लसीकरण प्रक्रियेलाही जोरदार सुरुवात झाली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता खंबीरपणे उभे राहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत लसीकरण प्रक्रियेचा तिसरा टप्पा चालू आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि ४५ पेक्षा वयाने जास्त व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण चालू आहे.
महापालिका शाळेतील शिक्षकांनाही लस देण्यात आली होती. मात्र खासगी शिक्षण संस्थेचा याबाबत कुठलाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे अनुदानित, विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थेमधील शिक्षकांना लवकरात लवकर कोव्हिडं लस उपलब्ध करून द्यावी. अशी विनंती महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.