Corona Vaccination In Pune: दिलासादायक; वर्षभरात जिल्ह्यातील दीड कोटी पुणेकरांना टोचली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 03:54 PM2022-01-17T15:54:15+5:302022-01-17T15:54:37+5:30
लसीकरणाची वर्षपूर्ती झालेली असताना पुणे जिल्ह्यात १ कोटी ६० लाख ९० हजार ५४७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करत केल्यावर १६ जानेवारी २०२१ रोजी देशात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाची वर्षपूर्ती झालेली असताना पुणे जिल्ह्यात १ कोटी ६० लाख ९० हजार ५४७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ वर्षे वयोगटावरील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नवीन वर्षात १५ ते १८ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे.
कोव्हिशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, तिसऱ्या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगट आणि चौथ्या टप्प्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाली.
पुणे जिल्ह्यात १५ जानेवारीपर्यंत १ लाख ५७ हजार ६७६ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस, तर १ लाख ४३ हजार १२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १६ हजार १५७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे. २ लाख ५२ हजार ५४५ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनी, तर २ लाख ३५ हजार ५३३ जणांनी, तर १० हजार ९७८ जणांनी लसीचा तिसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील २ लाख ३४ हजार २१५ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ५६ लाख ८४ हजार ४७२ जणांचा पहिला, तर ४१ लाख १४ हजार २०३ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १७ लाख १६ हजार ५६१ जणांनी, १४ लाख ८५२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ११ लाख ६१ हजार ९७ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला, ९ लाख ४८ हजार ४५४ जणांनी दुसरा, तर १४ हजार ६७० जणांनी तिसरा डोस घेतला.
सध्या जिल्ह्यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हिक्सिन लसीचे डोस उपलब्ध केले असून, लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात दाखल व्हावे लागणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ४ ते ५ टक्केच आहे. भविष्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसविरोधात लस नेमकी किती परिणामकारक ठरेल, सर्व वयोगटाच्या नागरिकांना बुस्टर डोस घ्यावा लागेल का, लसींमध्ये बदल करावे लागतील का, याबाबत अभ्यास सुरू आहे.