चार लसीकरण केंद्रांत ५९४० नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:21+5:302021-03-17T04:11:21+5:30
पांडुरंग मरगजे धनकवडी :धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार लसीकरण केंद्रांत पंधरा दिवसांत फक्त ५९४० नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला ...
पांडुरंग मरगजे
धनकवडी :धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार लसीकरण केंद्रांत पंधरा दिवसांत फक्त ५९४० नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लोकसंख्येच्या मानाने ही आकडेवारी अत्यंत कमी असून, लसीकरण मोहिमेला प्रतिसाद वाढविणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
पद्मावती येथील कै. शिवशंकर पोटे दवाखाना, धनकवडी येथील कै. विलासराव तांबे दवाखाना, कात्रज, संतोषनगर येथील हजरत मौलाना युनुस साहब रहेमतुल्ला अलेही दवाखाना व दत्तनगर जांभूळवाडी येथील स्व. रखमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा चार ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
पद्मावती येथील पोटे आरोग्य केंद्रात दि. १५ मार्च पर्यंत २५५७ नागरिकांनी लस घेतली, धनकवडी येथील कै. विलासराव तांबे आरोग्य केंद्रात १२८५, कात्रज, संतोषनगर येथील हजरत मौलाना युनुस साहब रहेमतुल्ला अलेही दवाखानात ९५२ तर दत्तनगर जांभूळवाडी येथील स्व. रखमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्रात ११४६ नागरिकांनी लस घेतली.
कोविन ॲपवर नोंदणी आणि प्रत्यक्ष जागेवर नोंदणी असे दोन्ही पर्याय उपलब्ध असताना ही उपलब्ध आकडेवारीवरून नागरिकांचा सर्वच आरोग्य केंद्रात थंड प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. कोविन ॲपवर नोंदणी आणि प्रत्यक्ष जागेवर नोंदणी असे दोन्ही ही पर्याय वापरून लस घेणाऱ्यांची संख्या वाढविणे, लोकांचा प्रतिसाद वाढविणे हेच एकमेव आव्हान प्रशासनासमोर दिसून येत आहे.
लसीकरणाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना कोविन ॲपमधील गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर कामकाजाची यंत्रणा सुरळीत सुरू झाली, मात्र लसीकरण केंद्रांची संख्या पाहता सहा लाख नागरिकांसाठी फक्त चारच केंद्र अपुरी ठरत आहेत.