लस आली पण लसीकरण होईना ! नवीन नियमामुळे पुण्यात गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 01:15 PM2021-05-19T13:15:32+5:302021-05-19T13:16:48+5:30
८४ दिवसांचा नियमामुळे नागरिकांवर परत येण्याची वेळ. आज नियोजन करणार महापौरांची माहिती.
दोन दिवसांचा ब्रेक नंतर आज पुण्यात लसिकरणाला सुरुवात झाली. मात्र ८४ दिवसांचा नियमामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांना लस ना घेताच परत येण्याची वेळ आली. हा नियम असताना आजचे लसीकरण नेमके कोणासाठी असा प्रश्न आता विचारला जातो आहे. तर हा प्रश्न लक्षात घेतला असून त्यानुसार नियोजन करू असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
पुणे शहरात लस संपल्याने कोव्हीशील्ड चे लसीकरण ४ दिवस तर संपूर्ण लसीकरण गेले दोन दिवस बंद होतं. त्या नंतर काल अखेर राज्य सरकार कडून पुणे महापालिकेला लसी प्राप्त झाल्या. अर्थात यामध्ये फक्त कोव्हीशिल्डचा लसी प्राप्त झाल्या आहेत. त्याही फक्त ७५०० लसी आज देण्यात आल्या आहेत. हे लक्षात घेऊन महापालिकेने फक्त दुसऱ्या डोस साठीच केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डोस साठी नोंदणी केलेले लोक तसेच वॉक इन लसीकरण केलं जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले.
मात्र नव्या नियमानुसार दोन डोस मध्ये आता ८४ दिवसांचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण १ मार्च ला सुरू झालेले असल्याने १ तारखेला पहिला डोस घेतलेल्यांचा दुसऱ्या डोस ची तारीख आता २४ मार्च रोजी येत आहे.त्यामुळे आज अनेक जणांना लसीकरण केंद्रांवर जाऊन परत येण्याची वेळ आली.
याविषयी बोलताना मनसे नेते रणजित शिरोळे म्हणाले ," नवीन नियमानुसार आज कोणतेच नागरीक लसीकरणासाठी पात्र होत नाहीयेत. त्यामुळे आज सकाळपासून लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांना परत पाठवले जात आहे. सकाळपासून अनेक नागरिकांचा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे हे देखील स्पष्ट होत आहे की आज लस शिल्लक राहणार आहे. या सगळ्या बाबत नेमकं काय नियोजन केले आहे ते महापालिकेने स्पष्ट करावं. "
याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारलं असता ते म्हणाले "आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर पैकी अनेकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यांचे लसीकरण आजचा टप्प्यात करण्यात येईल.याशिवाय जो इतर नागरिकांचा प्रश्न आहे त्या बाबत बैठक घेऊन आज आम्ही निर्णय घेणार आहोत. "