शहरात दिवसभरात १४ हजार १७९ जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:26+5:302021-05-06T04:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविन अॅपमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे काही काळ शहरातील विशेषत: १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविन अॅपमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे काही काळ शहरातील विशेषत: १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण बंद राहिले़ मात्र, दुपारनंतर हा अॅपमधील गोंधळ निस्तरला गेल्याने, आज शहरात दिवसभरात या वयोगटांतील २ हजार ८० जणांना पाच लसीकरण केंद्रांवर लस घेता आली़ तर, दुसरीकडे शहरातील सर्वच म्हणजे ११४ लसीकरण केंद्रांवर दिवसभरात १४ हजार १७९ लणांनी लस घेतली़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : शहरातील ११४ लसीकरण केंद्रांवर आज दिवसभरात ६१ हेल्थ वर्कर यांना पहिला, तर ३६० जणांना लसीचा दुसरा डोस दिला. फ्रंटलाईन वर्करपैकी ४०४ जणांना पहिला व ७८० जणांना दुसरा डोस दिला़ तर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांपैकी ३५१ जणांना पहिला व ६ हजार ३३३ जणांना लसीचा दुसरा डोस दिला आहे़ याचबरोबर ४५ वरील व ५९ वयाच्या आतील ८५९ जणांना लसीचा पहिला व २ हजार ९५१ जणांना दुसरा डोस दिला आहे़
शहरात एक मेपासून १८ ते ४४ वर्षे वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते़ मात्र, पहिल्या दिवशी शहरात कमला नेहरू रुग्णालय व राजीव गांधी रुग्णालय येथे केवळ एकूण मिळून ४६ जणांना लसीकरण होऊ शकले़ दोन दिवसांत यात सुधारणा होऊन कोविन-अॅपवरील वेळ व उपस्थितीनुसार दिवसाला येथे प्रत्येक ठिकाणी सव्वातीनशेपर्यंत सरासरी लसीकरण झाले़
राज्य शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध झाल्याने, महापालिकेने मंगळवारी रात्री जाहीर केल्याप्रमाणे बुधवारपासून आणखी तीन ठिकाणी म्हणजे, अण्णासाहेब मगर रुग्णालय हडपसर, लायगुडे रुग्णालय सिंहगड रोड व सुतार दवाखाना कोथरूड येथेही १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण सुरू केले़ या तीनही ठिकाणी कोव्हॅक्सिन डोस दिले गेले़ परंतु, प्रारंभी कोविन अॅपमध्ये बिघाड झाल्याने, नोंदणी दिसत नसल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. तरीही कित्येक नागरिकांनी चार तास वाट पाहिली मात्र काही झाले नाही. अखेर अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी लक्ष घातले आणि लसीकरण वितरणाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी हा प्रश्न सोडवला. पण, या सर्व घडामोडीत दुपारचे दीड वाजले आणि त्यानंतर लसीकरण सुरळीत सुरू झाले. अखेर आज सायंकाळपर्यंत १८ ते ४४ वयोगटांतील २ हजार ८० जणांना लसीकरण करण्यात आले आहे़