पुणे जिल्ह्यात १५ लाख महिलांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:17+5:302021-06-11T04:08:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मासिक पाळीमध्ये लस घेतल्यास त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो, अशा प्रकारचे गैरसमज सोशल मीडियातून ...

Vaccination of 15 lakh women in Pune district | पुणे जिल्ह्यात १५ लाख महिलांचे लसीकरण

पुणे जिल्ह्यात १५ लाख महिलांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मासिक पाळीमध्ये लस घेतल्यास त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो, अशा प्रकारचे गैरसमज सोशल मीडियातून पसरले होते. त्यात तथ्य नसल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. लस घेण्याबद्दल कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता तरुणी आणि महिला लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १५ लाख महिलांचे लसीकरण झाले आहे, तर १७ लाख पुरुषांचे लसीकरण झाले आहे.

स्तनदा माता आणि गर्भवती महिलांच्या लसीकरणालाही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील काळात महिलांच्या लसीकरणात आणखी वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लस घेतल्यानंतर एखादी महिला गर्भवती राहिल्यास गर्भधारणेच्या काळात महिलेला आणि अर्भकालाही लसीकरणाचा फायदा होईल, असे संशोधनही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण वेगवान होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, आता प्रक्रिया काहीशी सुरळीत होत असून दर आठवड्याला ५०हजार लसी मिळत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

-------

आतापर्यंत झालेले जिल्ह्यातील लसीकरण :

महिला :१५,०८,८४५

पुरुष : १७,७३,७०५

इतर : ३८३

--------

एकूण : ३२,८२,९३३

-------

वयोगटानुसार लसीकरण :

आरोग्य कर्मचारी : २४,२०८०

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी : ३,१८,२४३

१८-४४ वयोगट : ५,०१,७४०

४४-५९ वयोगट : १०,९४,९८०

६० वर्षांवरील : ११,२५,८९०

--------

मी लस नाही घेतली.....

आमच्या घरात सर्वांना गेल्या वर्षी कोरोना होऊन गेला. पती, मुलगा आणि सून यांनी लस घेतली आहे. मात्र, लस झाल्यानंतर खूप त्रास होतो. पतीला चार दिवस ताप होता, आठवडाभर अंग प्रचंड दुखत होते. त्यांच्या दुखण्याचा धसका बसल्याने मी अद्याप लस घेतलेली नाही.

- अनिता साळुंखे, ६३ वर्षीय महिला

--------

लस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो, असे ऐकले आहे. फक्त त्रास कमी होतो. आम्हाला संपूर्ण कुटुंबाला तीन महिन्यांपूर्वी कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे सध्या तरी लस घेण्याचा विचार नाही.

- रेश्मा शेख, 42 वर्षीय महिला

Web Title: Vaccination of 15 lakh women in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.