आंबेगाव तालुक्यात महालसीकरणात २५ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:16+5:302021-09-02T04:22:16+5:30
आंबेगाव तालुक्यात १०० केंद्रांवर आज कोरोनाचे महालसीकरण करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी नऊ वाजता लसीकरणाला प्रारंभ ...
आंबेगाव तालुक्यात १०० केंद्रांवर आज कोरोनाचे महालसीकरण करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी नऊ वाजता लसीकरणाला प्रारंभ झाला. तेव्हाच बहुतेक ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या वेळी ऑनलाईन नोंदणी करण्यात काही ठिकाणी अडचण आली. मात्र, प्रशासनाने ही अडचण तत्काळ दूर केल्यानंतर लसीकरणाने वेग पकडला. तालुक्याच्या बहुतेक गावात आज लसीकरण झाले आहे. सुरुवातीला ३० हजार लसींचे डोस उपलब्ध झाले होते. दुपारी डोस कमी पडणार ही जाणीव झाल्यानंतर लसीचे अतिरिक्त डोस मागवण्यात आले. त्याचप्रमाणे लसीकरणाची वेळ दुपारी तीनपर्यंत होती. मात्र, अनेक केंद्रांवर नागरिकांच्या रांगा कायम होत्या. त्यामुळे लसीकरणाची वेळ वाढवून सायंकाळी साडेसहापर्यंत करण्यात आली. अनेक नागरिकांना उशिराही लस घेता आली. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आजच्या महालसीकरण मोहिमेवर स्वतः लक्ष ठेवून होते. मंचर येथे नियोजनाची बैठक घेऊन शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील तसेच शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी मोठ्या संख्येने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केले.
मंचर शहरात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपजिल्हा रुग्णालयात स्वतः शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा हे दिवसभर उपस्थित होते. इतर केंद्रावर काही कमी पडल्यास तातडीने त्याची व्यवस्था केली जात होती. प्रशासनाने आजच्या लसीकरणाची जोरदार तयारी केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लसीकरण केंद्रांना भेट दिली. दिव्यांग व्यक्तींना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात होते. दिवसभर लसीकरणासाठी काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पराग उद्योग समूहाच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. जानकीदेवी बजाज फाउंडेशन यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम पार पडली.
निवडणुकीच्या निकालाच्या वेळी ज्याप्रमाणे मताधिक्य सांगितले जाते, त्याचप्रमाणे आज लसीकरणाची लाईव्ह अपडेट दिली जात होती. त्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात एक विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. प्रत्येक लसीकरण केंद्रावरील घडामोड त्याठिकाणी दाखवली जात होती. तसेच एका लिंकद्वारे मोबाईलवर हे सर्व पाहता येत होते. परिणामी लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला. .
मंचर शहरात मुस्लिम नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरण करून घेतले. लांडेवाडीची ठाकरवाडी येथील ग्रामस्थ लसीकरणासाठी यापूर्वी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, प्रशासनाने जनजागृती केली. त्याचा परिणाम दिसून आला. या ठिकाणी ठाकर समाजातील दीडशेहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची रांग लागली होती.
लसीकरणाची नावनोंदणी करण्यासाठी वेळ लागू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.