जिल्ह्यात ७० टक्के दिव्यांगांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:38+5:302021-07-09T04:08:38+5:30
पुणे : जिल्ह्यातील ४५ हजार दिव्यांग बांधवांचे सरसकट घरोघरी जाऊन लसीकरण करावे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या प्रहार संघटनेला यश मिळाले ...
पुणे : जिल्ह्यातील ४५ हजार दिव्यांग बांधवांचे सरसकट घरोघरी जाऊन लसीकरण करावे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या प्रहार संघटनेला यश मिळाले आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास ७० टक्के दिव्यांगांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर सुमारे २५ टक्के दिव्यांगांना दुसरा डोस मिळाला.
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव म्हणाले की, कोणत्याही अटी, शर्थीविना घरोघरी जाऊन दिव्यांगांचे लसीकरण करण्याची मागणी आम्ही केली होती. यासाठी आंदोलन करावे लागले. अखेर त्याची दखल शासनाने घेतली. आत्तापर्यंत ७० टक्के दिव्यांगांचे लसीकरण होऊ शकले आहे. उर्वरित लोकांसाठी पाठपुरावा सुरू आहे.
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे म्हणाल्या की, जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ४५ हजार दिव्यांग आहेत. मात्र, प्रशासन सुरुवातीला केवळ ४५ वयाच्या पुढील दिव्यांगांचे लसीकरण करणार असे म्हणत होते. ती संख्या केवळ ५ ते ६ हजारांच्या आसपास आहे. तर १८ ते ४५ या वयोगटात सर्वाधिक दिव्यांग असल्याने या गटाच्या लसीकरणासाठी पाठपुरावा केला त्यास यश मिळाले.