आठ दिवसांत युवावर्गातील ७४ हजार ६९१ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:59+5:302021-05-31T04:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराने २२ मे ते २९ मेपर्यंत लसीकरणात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराने २२ मे ते २९ मेपर्यंत लसीकरणात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, या आठ दिवसांत ७३ हजार ६९१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे, यामध्ये युवावर्गाचे म्हणजे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची टक्केवारीही ७५ टक्के असून, खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाने या युवा वर्गाला मोठा दिलासा दिला आहे़
२२ मेपासून पुन्हा सुरू झालेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण प्रक्रियेत प्रारंभी दिवसभरात ५६० पर्यंत असलेला हा आकडा दिवसेंदिवस दुप्पट होत गेला असून, २९ मे रोजी एका दिवसात या वर्गातील १० हजार २६८ जणांना लस देण्यात आली़ या दिवशी दिवसभरात एकूण ११ हजार ९८९ लसीकरण झाले होते़ राज्य शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू केले़ परंतु, प्रारंभीपासूनच ऑनलाईन नोंदणीचे बंधन व नोंदणी सुरू होताच बुक होणारे स्लॉट यामुळे त्रस्त झालेल्या या वयोगटातील लसीकरण कसे तरी १३ दिवस लसीकरण झाले़ मात्र, त्यानंतर ९ दिवस हे लसीकरण बंद होते़ त्यातच राज्य शासनाने या वर्गाच्या लसीकरणासाठीची अद्यापही महापालिकेच्या केंद्रांना परवानगी दिलेली नाही़ दरम्यान खासगी रुग्णालयात शहरात २२ मे पासून लसीकरण सुरू झाले व वर्गाला मोठा दिलासा मिळाला़ पुणे शहरात या वयोगटातील सुमारे २५ लाख लोकसंख्या आहे़
पुणे शहराने आजपर्यंत (२९ मे च्या आकडेवारीनुसार) दहा लाखांचा लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून, यामध्ये ४५ ते ५९ वयोगटात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ३८३ जणांचे लसीकरण झाले आहे़ तर यापैकी ५३ हजार ३८७ जणांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत़ शासनाच्या नव्या निर्णयामुळे ८४ दिवसांनी दुसरा डोस घ्यावयाचा असल्याने, या वर्गातील अनेकांचा दुसरा डोस ३९ दिवसांनी लांबला गेला आहे़
शहरात ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजे ६० वर्षांवरील वयोगटाचे लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले असून, ही संख्या २ लाख ८३ हजार ८०२ इतकी आहे़ यामध्ये १ लाख ३१ हजार २४० जणांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत़
--------------
२ लाख ५६ हजार २३८ जणांचे दोनही डोस पूर्ण
शहरात १८ वर्षांवरील साधारणत: ३२ लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे़ याला खासगी रुग्णालयांतील लसीकरणाने २२ मेपासून मोठी उभारी दिली आहे़ यामुळे आत्तापर्यंत झालेल्या एकूण १० लाख २५ हजार ५७३ जणांच्या लसीकरणामध्ये २ लाख ५६ हजार २३८ जणांचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत़
-------------
शहरातील एकूण लसीकरण
वर्ग पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ६०,०२१ ४६,२०६
फ्रं ट लाईन वर्क र ७०,२६० २५,४०५
ज्येष्ठ नागरिक २,८३,८०२ १,३१,२४०
४५ ते ५९ वयोगट ३,००,३८३ ५३,३८७
१८ ते ४४ वयोगट ५४,८६९ -----
----------------------------------