डिसेंबरपर्यंत लसीकरण होऊ शकते पूर्ण, ३२ लाख साठा करण्याची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:29+5:302021-05-31T04:08:29+5:30
पुणे : पुणे जिल्ह्यात लसीकरणासाठी ६०० लसीकरण केंद्रे उपलब्ध आहेत. तसेच, पुणे विभागात एका वेळी ३२ लाख लसींची साठवणूक ...
पुणे : पुणे जिल्ह्यात लसीकरणासाठी ६०० लसीकरण केंद्रे उपलब्ध आहेत. तसेच, पुणे विभागात एका वेळी ३२ लाख लसींची साठवणूक करण्याची क्षमता आहे. पुरेशा लसींचा साठा उपलब्ध झाल्यास डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण होऊ शकते, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
देशभरात १६ जानेवरीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात ४५ ते ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणालाही सुरुवात करण्यात आली होती. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, १५ टक्के लसीकरण अद्याप बाकी आहे. लसीकरणाचा वेग न वाढल्यास जास्तीत जास्त लोकसंख्येला कोरोनापासून संरक्षण कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरू करण्यात आले. मात्र, लसीचा अपुरा पुरवठा, कोविन अॅपवरील गोंधळ यामुळे लसीकरण पहिल्या दिवसापासून अडथळ्यांची शर्यत ठरली आहे.
------
आजपर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १४६२०१ ८७०२४
फ्रंटलाईन २१६८६६ ८५१९३
४५ च्या पुढील १७३१९९० ३९४३९२
१८ ते ४४ १२८८९२
-----
लसीकरण प्रारंभ - १६ जानेवारी
प्रत्येक दिवशी - १५ ते २० हजार
------
१८ पेक्षा कमी वयाचे काय?
१८पेक्षा कमी वयोगटासाठी अद्याप लस जाहीर झालेली नाही. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ० ते १८ वयोगटातील मुलांची संख्या ३० टक्के इतकी आहे.
------
लसींअभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद
सध्या लसीकरणासाठी जिल्ह्यात ६९९ केंद्रे आहेत. त्यापैकी ४१७ पुणे मनपा, १९७ पिंपरी चिंचवड तर ८५ पुणे ग्रामीणमध्ये आहेत. यातील अनेक केंद्रे लसींच्या पुरवठ्याअभावी बंद आहेत.
-----
लसींच्या पुरवठ्यावर सर्व नियोजन अवलंबून आहे. कोणत्या महिन्यात किती डोस येणार याचे अद्याप लेखी नियोजन प्राप्त झालेले नाहीत. आपल्याकडील लसीकरण केंद्रे, साठवणूक क्षमता पुरेशी आहे. पुणे जिल्ह्यात कोल्ड चेन पॉईंट, कोल्ड व्हॅक्सिनेशन सेंटर सुसज्ज आहेत. एका वेळी ३२ लाख लसींची साठवणूक करता येऊ शकते. लसींचे योग्य डोस मिळाल्यास पुणे जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत नक्की पूर्ण होऊ शकते.
- डॉ. संजय देशमुख, आरोग्य उपसंचालक, पुणे विभाग