लस घेतल्यानंतरही होऊ शकतो संसर्ग, नियमांची अंमलबजावणी हेच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:59+5:302021-02-20T04:26:59+5:30
लसीकरणानंतर तयार झालेल्या अँटिबॉडी किती काळ टिकतील, त्यांची पातळी काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. लस ७५ टक्के परिणामकारक ...
लसीकरणानंतर तयार झालेल्या अँटिबॉडी किती काळ टिकतील, त्यांची पातळी काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. लस ७५ टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. लस घेतल्यानंतर साधारण एक महिन्याने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. फ्ल्यूच्या लसीचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. या लसीचे दोन डोस दिल्यावर विकसित होणा-या अँटीबॉडी वर्षभर टिकतात. कोरोनावरील लसीबाबत सध्या तरी तसा अंदाज बांधता येऊ शकतो. कोणताही संसर्गजन्य आजार झाल्यास एक महिना लस देता येणार नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे पहिला डोस दिल्यावर कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजार झाल्यास लगेच दुसरा डोस देता येणार नाही. त्यामुळे बरे झाल्यावर एक महिन्याने दुसरा डोस देता येईल, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
सध्या आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे लसीकरण सुरू आहे. कोरोनाचा एक डोस घेतल्यानंतर ५० टक्के आणि दोन्ही डोस घेतल्यावर महिन्याभराने ९५ टक्के प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणजेच पहिला डोस घेतल्यानंतरही सामान्य लोकांप्रमाणेच संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे हे प्रतिबंधक उपाय पाळावे लागतील, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
-----
लस म्हणजे कवचकुंडले नव्हेत, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. लसीच्या चाचण्यांमध्येही ९५ टक्के परिणामकारकता सिद्ध होते, तेव्हा ५ टक्के संसर्गाची शक्यता गृहित धरलेली असते. लसीकरण झाल्यावर कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असली तरी निष्काळजीपणा सध्या कोणत्याही परिस्थितीत परवडणारा नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही सुरक्षा आणि खबरदारीच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे.
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय