लसीकरण केंद्र लोकप्रतिनिधींच्या ताब्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:52+5:302021-03-17T04:10:52+5:30
ऑन द स्पॉट: कल्याणराव आवताडे धायरी : वडगाव खुर्द येथील लायगुडे रुग्णालयात कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र ...
ऑन द स्पॉट: कल्याणराव आवताडे
धायरी : वडगाव खुर्द येथील लायगुडे रुग्णालयात कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र येथे ‘लोकप्रतिनिधीं’कडून आलेल्या यादीवरून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मात्र अधिकृत वेबसाइटवर जाऊन नावनोंदणी करण्यात येणाऱ्या नागरिकांना मात्र अपॅाइंटमेंट मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी ज्येष्ठांची ऑनलाइन नावनोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. माननीयांकडून होणारा उपक्रम जरी स्तुत्य असला तरी त्यांच्याकडे नावनोंदणी केलेल्या नागरिकांना लवकर अपॉइंटमेंट मिळते. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी घरबसल्या वेबसाइटवरून नावनोंदणी करावयाची असल्यास त्यांना मात्र लवकर अपॉइंटमेंट मिळत नाही. अर्ज भरताना नागरिकांच्या मोबाइलवर ओटीपी क्रमांक येत नसल्याने काहींना गेल्या काही दिवसांपासून नावनोंदणी करता येत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक ऑनलाइन नावनोंदणी न करता केंद्रावर येतात, अशा नागरिकांना नावनोंदणी करून लगेच लस दिली जाते. त्यामुळे अगोदर ज्यांनी नावनोंदणी केली आहे व ज्यांनी नावनोंदणी केली नाही, अशा दोन रांगा लसीकरण केंद्रावर लागल्या होत्या.
------------------------
सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; पिण्याच्या पाण्याची सोय नाही
ज्येष्ठ नागरिकांना गेटच्या बाहेर रांगेत उभा केले जाते. तीन - चार तास गेटच्या बाहेर उभा राहिल्यानंतर नंबर येतो. रांगेत थांबलेल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे शारीरिक अंतर पाळले जात नाही. लसीकरण केंद्रावर स्वच्छतागृहाची सोय नसून, पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. उन्हात उभे राहावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे.
---------------
लस दिल्यानंतर आरामासाठी सोय आहे. ॲानलाइन नोंदणी करून आलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य दिले जाते. जे नागरिक नावनोंदणी न करता येतात. त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागते. आलेल्या सर्व नागरिकांना लस दिली जाते.
- डॉ. उज्ज्वला देशमुख, मेडिकल ऑफिसर, स्व. लायगुडे रुग्णालय लसीकरण केंद्र
--------------------
फोटो ओळ : स्व. लायगुडे रुग्णालय, वडगाव खुर्द : गेटच्या बाहेर तीन-चार तास ज्येष्ठ नागरिकांना उभे करण्यात येत आहे.