लसीकरण केंद्रांचे सुसुत्रीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:31+5:302021-06-25T04:09:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात लसीकरण मोठ्याप्रमाणात सुरू आहे. खाजगी आणि सरकारी केंद्रावर लस दिली जाते. ग्रामीण भागात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात लसीकरण मोठ्याप्रमाणात सुरू आहे. खाजगी आणि सरकारी केंद्रावर लस दिली जाते. ग्रामीण भागात खाजगी २५ तर ४०७ सरकारी केंद्र आहेत. पुणे, पिंपरीमध्येही लसीकरण सुरू आहे. अनेक कंपन्यांमार्फतही कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. मात्र, या केंद्रावरून एकत्र माहिती घेतांना अडचणी येत आहेत. तसेच केंद्र कुठल्या हद्दीतील आहे, याची माहिती कोविन पोर्टलवर येत नसल्याने माहितीचे एकत्रीकरण करतांना यंत्रणांना अडचणी येत आहे. ही अडचण दुर करण्यासाठी लसीकरण केंद्रांचे सुसुत्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी दिली.
कोरोनाचा प्रभाव करण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वांचे लसीकरण हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण हे संथ गतीने होत असले तरी लवकरात लवकर करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे. पूर्वी लसीची उपलब्धता ही समस्या होती. आताही ही काही प्रमाणात येत असली तरी काही दिवसांपासून जिल्ह्याला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा हाेत आहे. जिल्ह्यात सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रावर रोज होणारे लसीकरणाची माहिती संध्या कोविन ॲप च्या साह्याने घेतली जाते. मात्र, ही माहिती घेताना केंद्र पुणे, पिंपरी, ग्रामीण हद्दीतील आहे याची योग्य माहिती मिळत नसल्याने लसीकरण नेमके किती झाले, ही माहिती घेण्यास अडचणी सध्या येत आहेत. सध्या केंद्रांशी संपर्क साधून ही माहिती घेतली जाते. मात्र, त्यात अनेकदा तफावत आढळते. यामुळे माहिती एकत्रीकरणाला अनेकदा विलंब होतो. तसेच योग्य माहिती घेतली जात नसल्याने गोंधळ होत होता. तो टाळण्यासाठी आता सर्व केंद्रांचे सुसुत्रीकरण केले जाणार आहे. कोविन पोर्टलवर त्या लसीकरण केंद्रापुढे ते ग्रामीण भागातील आहे की शहरी याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे केंद्राचा शोध घेऊन त्या केंद्रावर किती लसीकरण झाले याची माहिती घेणे सोपे होणार आहे. या सर्वांची माहिती एकत्रित करून ती दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे सर्व केंद्रांची एकत्रित आणि अचूक माहिती मिळणे शक्य होणार असल्याचेही येडके यांनी सांगितले.
चौकट
ग्रामीण भागात ४०७ सरकारी तर २५ खाजगी लसीकरण केंद्र आहेत. पुणे शहरात १८६ सरकारी तर ८३ हे खाजगी लसीकरण केंद्र आहेत. तसेच कंपन्या आणि काही सोसायट्यांच्या माध्यमातूनही लसीकरण राबविण्यात येत आहेत. कोविन पोर्टलवर ते कुठल्या भागातील आहे. याची अद्ययावत माहिती नसल्याने माहिती घेताना घोळ होतो. तो टाळण्यासाठी केंद्राच्या नावापुढे ते ग्रामीण भागातील आहे की शहरी, याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे त्याचा पोर्टलवर शोध घेऊन एकत्रित माहिती घेणे शक्य होणार आहे. येत्या दोन ते तिन दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
कोट
डिंसेंबरपर्यत लसीकरण पूर्ण करणार
जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत ११ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या बघता त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने अधिक वेगाने लसीकरण राबविता येत नाही. मात्र, येत्या डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.
डॉ. सचिन येडके, जिल्हा लसीकरण अधिकारी