लहान मुलांच्या लसीकरणाला लवकरच होणार सुरुवात; पुण्यात दोन ठिकाणी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:20 AM2021-06-28T11:20:21+5:302021-06-28T11:21:26+5:30
देशभरात मुलांच्या वयोगटानुसार तीन टप्प्यात लसीकरण चाचणी
पुणे: सिरम इन्स्टिट्यूट ने लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोव्हाव्हॅक्स या लसीच्या चाचणीला जुलैपासून सुरुवात होणार आहे. पुण्यात भारती रुग्णालय आणि केईएम रुग्णालयाच्या वढू येथील केंद्रात या चाचण्या होणार आहेत.
२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी तीन टप्प्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ११ ते १८ वयोगटातील मुलांची चाचणी होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६ ते १० तर तिसऱ्या टप्प्यात २ ते ५ वयोगटातील मुलांची चाचणी केली जाणार आहे. अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटने दिली आहे. चाचण्यांमधून ही लस प्रभावी, सुरक्षित तसेच किती परिणामकारक आहे. याची तपासणी केली जाणार आहे. चाचण्यांचे निष्कर्ष यायला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेत नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या नोव्हाव्हॅक्स या लसीचे सिरमने भारतात कोव्हाव्हॅक्स नावाने उत्पादन सुरू केले आहे. त्यासाठी भारतात लसीच्या चाचणीची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय औषध महानियंत्रकांना अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
" देशभरात ९२० मुलांवर चाचणी होणार असून पहिल्या टप्प्यात ११ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. प्रत्येक केंद्रावर १०० मुलांवर चाचणी होईल. असा अंदाज केईएम रुग्णालयाचे संशोधक डॉ आशिष बावडेकर यांनी वर्तवला आहे."
भारतात होणार दहा ठिकाणी चाचणी
देशभरात दहा ठिकाणी लहान मुलांवर या लसीची चाचणी होणार आहे. नऊशेहून अधिक मुलांना लस देण्यात येईल. असे नियोजन करण्यात आले आहे.