Corona Vaccination In Pune: दिवाळीच्या चार दिवसात लसीकरणाला सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:40 PM2021-11-03T20:40:03+5:302021-11-03T20:40:38+5:30
शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या दवाखान्यात अर्धा दिवस लस उपलब्ध राहणार
पुणे : लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून म्हणजेच १६ जानेवारीपासून प्रथमच, दिवाळीमुळे सलग चार दिवस ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार आहे. मात्र शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या दवाखान्यात अर्धा दिवस लस उपलब्ध राहणार आहे.
महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजन (दि. ४), पाडवा (दि. ५), भाऊबीज (दि. ६) व रविवारची (दि. ७) साप्ताहिक सुट्टी सलग आल्याने, लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सलगच्या सुट्यांमुळे लसीकरणात खंड पडू नये म्हणून, महापालिकेच्या दवाखान्यातील केंद्रांवर शुक्रवारी दुपारपर्यंत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात ५१ लाख जणांचे लसीकरण
शहरात २ नोव्हेंबरपर्यंत ५१ लाख १६ हजार १२४ जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ३२ लाख ३ हजार ४०२ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर १९ लाख १२ हजार ७७२ जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.