जिल्ह्यात लसीकरणाचा गोंधळ, केंद्रांना होतोय अल्प पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:23+5:302021-05-01T04:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात लसीकरण माेहिम वेगात असतांनाच योग्य प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने याचा परिणाम या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात लसीकरण माेहिम वेगात असतांनाच योग्य प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने याचा परिणाम या लसीकरण मोहिमेवर होत आहे. ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५० वर्षांवरील अनेकांनी पहिला डोस घेतला. मात्र, लसीचा पुरवठा कमी होत असल्याने त्यांना दुसरा डोस घेण्यास अडचणी येत आहेत. त्यात १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार असल्याने हे लसीकरण कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविली. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंन्ट लाईन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले तर. तर दुसऱ्या टप्यात ६० वर्षांपुढील जेष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक व सहव्याधी असणाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशील्ड ही लस देण्यात आली. सुरुवातीला या लसीसा पुरवठा राज्याकडून योग्य प्रमाणात झाला. मात्र, लसीकरणाचा वेग वाढल्याने जिल्ह्याला पाहिजे त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही. जिल्ह्यातील ४७ हजार ८९७ हेल्थ केअर वर्कर्सला पहिला डोस देण्याता आला. तर ३७ हजार ५१३ जणांनी दुसरा डोस घेतला. तर ८१ हजार ८३ फ्रंन्ट लाईन वर्कर्सनी पहिला तर २६ हजार ७६४ दुसरा डोस घेतला.
जिल्ह्यात ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ७६ हजार ७०४ ऐवढी आहे. यातील ३ लाख ५६ हजार ७९० लाभार्थ्यांनी पहिला तर ३७ हजार ५१३ जणांणी केवळ दुसरा डोस घेतला आहे. अद्याप दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ४५ ते ५९ वर्षाच्या नागरिकांचीही हीच अवस्था आहे. ३ लाख ३६ हजार ९३ नागरीकांनी ही लस घेतली. तर केवळ १८ हजार ४३५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात रोज पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, लसींचा पुरवठा कमी होत असल्याने प्राधान्यांने दुसरा डोस देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्याला बुधवारी ४० हजार लसी प्राप्त झाल्या. दोन दिवस हे लसीकरण चालले. मात्र, शुक्रवारी केवळ १० हजार लसी जिल्ह्यासाठी मिळाल्याची माहिती आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. त्यात शासनाने १८ वर्षांवरील प्रत्येकाला लसीकरण सुरू केल्यामुळे दुसरा डोस मिळणार की नाही ही परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात लसींचा पुरवठा कमी होत असल्यामुळे लसीकरणाचा वेग हा मंदाविण्याची शक्यता आहे.
चौकट
अठ्ठावीस दिवसांत दुसरा डोस न घेतल्यास पहिल्या डाेसचा प्रभाव कमी होण्याची शक्यता
कोरोना विषाणु विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक्षमता तयार होण्यासाठी दोन लसींचा डोस घ्यावा लागतो. पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर घेणे बंधन कारक आहे. या दिवसांत लस न घेतल्यास पहिल्या डोसचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, लसींचा पुरवठा कमी होत असल्याने लस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळणार की नाही या संभ्रमात नागरिक आहेत.