बेलसर प्रथमोपचार केंद्रात चार हजार नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:44+5:302021-04-06T04:10:44+5:30
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी ग्रामीण रुग्णालये, तसेच बेलसर, माळशिरस, परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम ...
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी ग्रामीण रुग्णालये, तसेच बेलसर, माळशिरस, परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बेलसर आरोग्य केंद्र येथे २५ जानेवारीपासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात डॉक्टर्स, आरोग्यसेविका, आशा वर्कर,पोलीस,आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेले ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात नागरिकांना मर्यादा येत असल्याने बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्यवस्था केली गेली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. सुरवातीला लसीकरणाला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र लसीकरण सुरक्षित असल्याबाबत प्रबोधन केल्याने नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रात जशी लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात रोज शंभर ते पाचशे नागरिकांना लसीकरण केले जात आहे. दि. ५ एप्रिल अखेर या केंद्रात ३७३४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत अजूनही काही नागरिकांच्या भीती आहे. मात्र पहिला डोस दिल्यानंतर केवळ पाच टक्के लोकांना अंगदुखी, ताप आदी सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. हा त्रास होऊ नये यासाठी लसीकरणावेळी औषधे दिली जात आहेत, असे डॉ. भरतकुमार शितोळे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना.