खराडीत एकाच दिवसात चार हजार व्यक्तींचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:44+5:302021-06-09T04:11:44+5:30
पुणे: कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी यंत्रणांना स्वयंसेवी संस्थांची मदत लाभली, तर लसीकरण मोहिमेचा वेग वाढून ही लढाई सोपी होऊ ...
पुणे: कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी यंत्रणांना स्वयंसेवी संस्थांची मदत लाभली, तर लसीकरण मोहिमेचा वेग वाढून ही लढाई सोपी होऊ शकते. कोरोनाकाळात स्वयंसेवी संस्थांनी अनेक पद्धतीने योगदान दिले. याला अनुसरून कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांची आहे, या भावनेतून लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सुरेंद्र पठारे फाउंडेशनने ‘लसीकरण आपल्या दारी’ मोहीम सुरू केल्याचे सांगितले.
लसीकरण मोहिमेचे उद्घाटन माजी आमदार बापू पठारे यांच्या हस्ते फॉरेस्ट कौंटी सोसायटीतून करण्यात आले. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सुरेंद्र पठारे म्हणाले की, नागरिक आणि लसीकरण यंत्रणा यांची वेगवान लसीकरणासाठी सांगड घालून देण्याचे काम स्वयंसेवी संस्था करू शकतात. हा विचार करून संस्थेने पुढाकार घेत स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित यंत्रणा यांच्यासोबत चर्चा करून लसीकरणाची परवानगी मिळवली. त्यानुसार खराडी आणि विमाननगर परिसरातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. शनिवारी फाउंडेशनच्या सहभागाने खराडीतील १२ सोसायट्यांमधील चार हजार नागरिकांचे एका दिवसात लसीकरण केले. याप्रमाणे पुढील दहा दिवसांत १२२ सोसायट्यांमधील २५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
पुढे ते म्हणाले की, पुणे महानगरपालिकेने शहरात पहिली परवानगी आमच्या संस्थेला दिली आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येणार आहे. एका दिवसात चार नागरिकांचे लसीकरण करणे ही मोठी गोष्ट आहे. लसीकरण जेवढ्या वेगाने होईल तेवढे कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण मिळणार आहे. कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यात यामुळे शक्य होणार आहे.