आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:25+5:302021-09-13T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे अद्यापही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. याविषयी वरिष्ठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे अद्यापही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना करून ही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कर्मचारी लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे.
ग्रामीण भागात दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण २९ टक्के आहे. तो वाढविण्याची गरज आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे असलेली माहिती वेळेत पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लस घ्या, अशा सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संकलित करून ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असून, उपविभागीय अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील लसीकरणाचा आढावा घ्यावा, तसेच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्फत कर्मचा-यांनी लसीकरण घेतल्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे सूचना देण्यात आले आहे. आपल्या कार्यालयातील कर्मचा-यांनी दोन्ही डोस घेतल्याची खातरजमा करुन प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.