माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:07+5:302021-05-18T04:12:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. मात्र, लस नसल्याने १८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. मात्र, लस नसल्याने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबवले आहे. हीच परिस्थिती जनावरांची देखील आहे. जिल्ह्यात जवळपास १० लाख ९० हजार पशुधन आहे. त्यांना विविध रोगांपासून वाचवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पशुसंवर्धन खात्यामार्फत लसीकरण मोहीम राबविली जाते. मात्र, अद्यापही लसीकरण पूर्ण न झाल्याने त्यांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता आहे.
पशुधनांना वेगवगळ्या हवामानात विविध रोगांची लागण होत असते. प्रामुख्याने जनावरांना घटसर्प, लाळ्याखुरकत, फऱ्या, आंतरविषार हे आजार होतात. नदीकाठच्या जनावरांना घटसर्प, तर कालवड, तसेच दोन ते तीन वर्षांच्या जनावरांना फऱ्या आजार होतो. शेळ्या मेंढ्यांना आंतरविषार आजार होत असतो. लाळ्याखुरकत रोगामुळे जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते. यामुळे या विविध रोगांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी लसीकरण मोहीम राबविली जाते. साधारण नोव्हेंबर महिन्यात ही लस दिली जाते. मात्र, कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे तसेच कोरोना कामात पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण होऊ शकले नाही.
लसीकरणासाठी जिल्ह्यात लसी आल्या. घटसर्पच्या १ लाख ५८ हजार लसी पशुसंवर्धन विभागाला मिळाल्या. ५९ हजार फऱ्या रोगावरील आणि आंतरविषार आजारावरील १ लाख ५२ हजार लसी मिळाल्या. या लसी पशुपालकांच्या घरी जाऊन द्याव्या लागतात. मनुष्यबळाची कमतरता, त्यात कोरोनामुळे लागलेली संचारबंदी तसेच पशुपालकांची उदासीनता यामुळे या लसी ठरलेल्या वेळात देता आलेल्या नाहीत. परिणामी पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा परिणाम या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.
चौकट
जिल्ह्यातील जनावरांची आकडेवारी
गायी ८ लाख ४३ हजार
म्हशी २ लाख ९५ हजार
शेळ्या २ लाख ८५ हजार
मेंढ्या ५ लाख ५५ हजार
डुक्कर ८ हजार ५००
चौकट
जिल्ह्यात प्रामुख्याने लाळ्याखुरकत, आंतरविषार, फऱ्या, घटसर्प हे आजार जनावरांना होतात. नदीकाठच्या जनावरांना घटसर्प तर कालवड, तसेच दोन ते तीन वर्षांच्या जनावरांना फऱ्या आजार होतो. शेळ्या मेंढ्यांना आंतरविषार आजार होत असतो. लाळ्याखुरकत रोगामुळे जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते.
कोट
कोरोनामुळे जनावरांचे लसीकरण यंदा रखडले. त्यात अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाले. कोरोना व्यवस्थापनातही काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने याचा परिणाम पशुधनाच्या लसीकरणावर झाला. येत्या काळात पशुधनांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
-बाबूराव वायकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती
चौकट
नोव्हेंबर हुकला, आता काय होणार
साधारणत: नोव्हेंबर महिन्यात जनावरांचे लसीकरण केले जाते. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जनावरांचे लसीकरण पूर्ण करता आले नाही. मात्र, पावसाळ्यापूर्वी हे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विधाटे यांनी सांगितले.
कोट
पशुपालक चिंतेत
१) दुग्ध व्यवसायावर आमच्या कुटुंबाची मदार आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला. ही जनावरेच आमच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यांना आम्ही आमच्या लेकराप्रमाणे जपतो. मात्र, त्यांचे लसीकरण योग्य वेळेत झाले नाहीत तर रोगामुळे ती दगावण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लवकर त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.
-शांताराम काळे, पशुपालक, घोडेगाव
२) लाळ्याखुरकत रोगाचा मोठा धोका गाई, म्हशींना असतो. यासाठी लसीकरण गरजेचे असते. आम्ही पशुपालकांना काळजीने रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांचे लसीकरण करत असतो. मात्र, कोरोनामुळे यंदा शक्य झाले नाही. मात्र, पशुसंवर्धंन विभागाने तरी घरपोच लसीकरण करणे गरजेचे होते. ते न झाल्यामुळे आमची जनावरे रोगामुळे दगावण्याची चिंता आम्हाला सतावत आहे.
-रमेश गोगावले, पशुपालक,बारामती