जेजुरी रुग्णालयातील लसीकरण पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:45+5:302021-05-09T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : येथील ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन बुकिंगनुसार लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन बुकिंगमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : येथील ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन बुकिंगनुसार लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन बुकिंगमुळे स्थानिकांना लस मिळत नसल्याने जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक अजिंक्य देशमुख, नगरसेविका रुक्मिणी जगताप तसेच सेनेचे शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे यांनी शनिवारी (दि. ८) रुग्णालयात जाऊन स्थानिकांना प्रथम लसीकरण द्या, मगच इतरांचे लसीकरण करण्याचा आग्रह धरीत लसीकरणच बंद पाडले. जेजुरी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले आहे.
१८ ते ४४ वयोगटासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने लसीकरण नोंदणी होत असल्याने दररोज पुणे व इतर ठिकाणच्या नागरिकांची लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. बाहेरगावाहून येथे येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही जास्त असल्याने जेजुरीकर नागरिक व लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष आहे. शनिवारी (दि. ८) सकाळी मात्र हा असंतोष उफाळून आला. नगराध्यक्षांनी स्वतः कार्यकर्त्यांसह ग्रामीण रुग्णालयात जाऊन लसीकरणच बंद पाडले. ऑनलाइन नोंदणीमुळे बाहेरगावाहून नोंदणी केलेल्यांची संख्या जास्त असते. १०० नोंदणीमधून स्थानिक केवळ चार ते पाच जणच असतात. यामुळे स्थानिकांवर अन्याय होत आहे. रुग्णालय प्रशासनाने दररोजच्या लसीकरणात ५० टक्के स्थानिकांना ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करून लसीकरण करावे, अशी आग्रही मागणी करीत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरू करूच नका, असा आग्रह ही त्यांनी धरला होता. वातावरण चांगलेच तणावाचे बनले होते. यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. शेवटी तहसीलदार रूपाली सरनोबत यांनीही रुग्णालयात येऊन आंदोलक कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेऊन, तुमचे म्हणणे शासन दरबारी मांडून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलिसांनी ही आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
प्रशासनाकडून योग्य ती दाखल घेतली जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरळीत पार पडले. शासनाच्या नियमानुसार लसीकरण सुरू आहे. यात कोणीही अडचणी आणू नयेत. स्थानिकांना संधी मिळत नाही ही बाब जरी खरी असली तरी ही त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून निर्णय घ्यावे लागणार आहेत. आंदोलक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही शासन दरबारी मांडून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी आंदोलकांना दिले आहे
चौकट
ऑनलाइन पद्धतीमुळे ग्रामीण भागातील लोकांना एक तर ऑनलाइन पद्धत माहीत नाही. माहीत असली तरी नेटवर्क मिळत नसल्याने नोंदणी होत नाही. याऊलट सकाळी सकाळीच ऑनलाइन नोंदणी अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होत असल्याने नोंदणीही होऊ शकत नाही. याचा फटका ग्रामीण भागातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना बसत आहे. ऑनलाइन नोंदणी केली तरी ही ऑफलाइन नोंदणी करून स्थानिकांना ही संधी मिळायला हवी, अशी मागणी आमदार संजय जगताप मित्र मंडळाचे प्रमुख नगरसेवक अजिंक्य देशमुख यांनी केली.
चौकट
ऑनलाइन नोंदणीमधून पुणे शहरातील नोंदणी जास्त होत आहे. पुण्याहून लसीकरणासाठी येथे येणाऱ्यांची संख्या ९० ते ९५ टक्के आहे. त्याचबरोबर पुण्यात कोरोनाचा प्रसार जास्त असल्याने येथे लसीकरणासाठी येणाऱ्यांकडून जेजुरीत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. पुण्यातील लोकांनी पुण्यातच लस घ्यावी. शासनाने त्यांच्यासाठी पुण्यातच लसीकरण केंद्रांची निर्मिती करावी. किंवा येथे लसीकरणासाठी येणाऱ्यांची कोरोना चाचणी आवश्यक करावी. पालिका प्रशासन बाहेरगावाहून येथे लसीकरणासाठी येणाऱ्यांची कोविड चाचणी अहवाल पाहूनच शहरात प्रवेश देईल, अशी भूमिका नगराध्यक्षा सौ. वीणा सोनवणे यांनी प्रशासनासमोर मांडली. लवकरात लवकर शासनाने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आम्ही बाहेरगावाहून येथे येणाऱ्यांना शहरात प्रवेश देणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
चौकट
केंद्र शासनाने लसीकरणाची सुविधा काही ठिकाणीच सुरू केली आहे. त्याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य असावे असा जरी स्थानिकांचा अधिकार वा आग्रह असला तरीही त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर त्यांना सुचवलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी लसीकरण करून घ्यायचा त्यांना अधिकार आहे. त्यांच्या अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही. नाइलाजास्तव पोलिसांना कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.
फाेटो :