पुण्यातील वीस हजारपेक्षा जास्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:40+5:302021-09-23T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरासह ग्रामीण भागातीलदेखील रुग्णसंख्या चांगलीच कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरासह ग्रामीण भागातीलदेखील रुग्णसंख्या चांगलीच कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी घेऊ शकतात. परंतु आजही पुणे शहर आणि ग्रामीण भागातील तब्बल २० हजार ६२७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामध्ये ८५ टक्क्यांपेक्षा शासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु खासगी शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशात उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, तामिळनाडूसह अन्य काही राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातदेखील शाळा सुरू करण्याची मागणी पालकांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीतदेखील याबाबत चर्चा होऊ शकते. शिक्षण विभागाने राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सकडे शाळा सुरू करण्याबाबत कोणती खबरदारी घेता येईल, याची विचारणा केली होती.
शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करा, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील पुणे जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुणे जिल्ह्यात शासकीय शाळेत २८ हजार ८९९, तर खासगी शाळांमध्ये ३१ हजार ३१५ शिक्षक काम करतात. जिल्ह्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ६० हजार २५० एवढी आहे. यापैकी अद्यापही २० हजार ६२७ शिक्षक व शिक्षकेतर लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही.
----
ग्रामीणमध्ये ९५ टक्के तर शहरात ५०-५५ टक्के लसीकरण
ग्रामीण भागात शासकीय व खासगी दोन्ही सुमारे ९५ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहरी भागात ५०-५५ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास पुणे शहरातील अनेक शाळांना शिक्षकांचे लसीकरण अपूर्ण असल्याने अडचण येऊ शकते.