पाच हजार तृतीय पंथीयांपैकी अवघ्या ५ टक्क्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:09+5:302021-07-14T04:15:09+5:30
पुणे : कोरोनाची साथ रोखण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव उपाय उपलब्ध आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजार तृतीय पंथीय नागरिक ...
पुणे : कोरोनाची साथ रोखण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव उपाय उपलब्ध आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजार तृतीय पंथीय नागरिक आहेत. समाजाचा अद्यापही त्यांच्याकडे पाहण्याचा न बदललेला दृष्टिकोन, मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यात येणाऱ्या अडचणी आणि तृतीय पंथीयांमध्ये असणारे गैैरसमज, कागदपत्रांचा अभाव, लसींचा अपुरा पुरवठा यामुळे त्यांच्या लसीकरणाची प्रक्रिया संथ आहे. आतापर्यंत केवळ ५ टक्के तृतीय पंथीयांचे लसीकरण झाले आहे.
लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना राज्याकडून सर्व जिल्ह्यांमधील लसीकरण यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग नागरिक, गर्भवती महिला, तृतीयपंथी अशा विविध घटकांच्या लसीकणावर भर देण्याची आहे. जिल्ह्यात दररोज होणाऱ्या लसीकरणात तृतीय पंथीयांचे प्रमाण ०.२५ ते ०.३० टक्के इतके कमी आहे. बरेचदा तृतीयपंथीय कुटुंबापासून दुरावलेले असल्याने त्यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसते. त्यामुळे लसीकरणात अडचणी निर्माण होत आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशांचे फोटो काढून, ओळखीचा एखादा पुरावा जोडून त्यांचे लसीकरण केले जात आहे.
चौकट
विशेष लसीकरण मोहिमेत पहिल्या दिवशी दोनशे, तर दुसऱ्या दिवशी अंदाजे साडेतीनशे तृतीय पंथीयांचे लसीकरण झाले. ग्रामीण भागातील तृतीय पंथीयांशी संपर्क साधून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे. तृतीयपंथी सामान्य लसीकरण केंद्रांवर गेल्यास त्यांना लोकांकडून नीट वागणूक मिळत नाहीत. त्यांना पाहून नाके मुरडली जातात. ग्रामीण भागात या अडचणी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग असावा, २० खाटा राखीव असाव्यात, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात केली आहे.”
- सोनाली दळवी, तृतीयपंथी कार्यकर्ती
चौकट
“जास्तीत जास्त तृतीय पंथीयांनी लसीकरण करावे, यासाठी त्यांचे समुपदेशन होणेही आवश्यक आहे. कर्नाटक, तसेच आजूबाजूच्या गावांमधील काही तृतीयपंथी पुण्यात आहेत. लस घेतल्याने काही लोकांचा मृत्यू झाल्याच्या अफवा त्यांच्या कानावर येत आहेत. त्यामुळे ते घाबरले आहेत. गैैरसमज दूर करणे आणि लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगणे गरजेचे आहे. सध्या शंभरपैैकी साधारण ५ तृतीय पंथीयांचे लसीकरण होत आहे.”
- चांदनी गोरे, तृतीयपंथी कार्यकर्ती
चौकट
गेल्या दोन दिवसांतील लसीकरण
दिनांक पुरुष महिला तृतीय पंथीय
११ जुलै -७४४० -५७७८ -५
१२ जुलैै -२१ हजार ७७७ -१७ हजार ६२३ -९९