जिल्ह्यात गरोदर मातांचे आजपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:43+5:302021-07-09T04:08:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात शुक्रवारपासून गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ...

Vaccination of pregnant mothers in the district from today | जिल्ह्यात गरोदर मातांचे आजपासून लसीकरण

जिल्ह्यात गरोदर मातांचे आजपासून लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात शुक्रवारपासून गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तयारी करण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या मोहिमेचा जास्तीत जास्त गरोदर मातांनी लाभ घ्यावा व कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

कोविडबाधित गरोदर महिलांमध्ये प्रसूती काळ पूर्ण होण्याआधी प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गरोदरपणातील इतर संभाव्य धोके व नवजात बालकांना इजा होण्याचे प्रमाण अधिक आढळून येऊ शकते.

बहुतेक सर्व कोरोनाबाधित गरोदर महिलांना सुरुवातीला जरी सौम्य प्रकारची लक्षणे असली तरी, त्यांची तब्येत अचानक ढासळू शकते व त्यामुळे बाळ दगावण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो. लसीकरणामुळे होणारे फायदे हे कोरोनामुळे होणाऱ्या तोट्याच्या तुलनेने अधिक असतील. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांना कोविड लसीकरण करण्याबद्दल मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या होत्या. कोविड संसर्गाचा जास्त धोका असणाऱ्या किंवा सहव्याधी असणाऱ्या गरोदर महिलांमध्ये तीव्र संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. यामुळे जिल्ह्यात ही लसीकरण मोहीम शुक्रवारपासून राबविली जाणार असल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन साडेपाच महिने पूर्ण झालेले आहेत. त्यादरम्यान १९ मे रोजी स्तनदा मातांना कोविड लसीकरण सुरू करण्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार गरोदर महिलांना लसीकरण करून घेता येणार आहे. गरोदर महिलांनी लसीकरण करून घेतल्यास ते फायदेशीर ठरेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे प्रत्येक गरोदर महिलांनी संपूर्ण माहिती दिल्यास त्यानंतर त्यांना स्वेच्छेने लसीकरण करून घेता येणार आहे.

चौकट

कोविड लसीकरण कार्यक्रम राबवत असताना आपल्याला येत असलेल्या अनुभवातून गरोदर महिला व नवजात बालक यांना यापासून दुष्परिणाम होणार नाहीत असे वाटते; परंतु दीर्घकालीन दुष्परिणाम व सुरक्षितता याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. म्हणून कोणत्याही औषधाप्रमाणे ही लस घेतल्यानंतर सौम्य स्वरूपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा एक ते तीन दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते.

तुरळक स्वरूपात एक ते पाच लाखांमध्ये एखाद्यास काही लक्षणे आढळू शकतात. यामुळे स्वत:साठी आणि बाळासाठी गरोदर महिलांनी लसीकरण करावे.

- प्रमोद काकडे, आरोग्य व बांधकाम सभापती

कोट

कोणत्याही महिलेला कोरोना झाला असेल तर त्या प्रादुर्भावास सुरुवात झाल्यापासून १२ आठवड्यांनंतर किंवा बरे झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनंतर लसीकरण करून घेता येईल. ज्या महिलांमध्ये सध्या कोरोनाची लक्षणे दिसत आहेत किंवा ज्या महिलांना मोनॉक्लोनल अ‍ॅँटिबाॅडीज किंवा प्लाझ्मा उपचार घेतले आहे, त्यांनी तूर्तास लसीकरण करून घेऊ नये. ज्या महिलेला गरोदर काळामध्ये कोरोना झाला असेल, अशा महिलांनी प्रसूती झाल्यानंतर लसीकरण करून घ्यावे.

- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद

Web Title: Vaccination of pregnant mothers in the district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.