पुण्यात लसीकरणाच्या प्रक्रियेतला सावळा गोंधळ संपेच ना ; नागरिकांचा तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 06:16 PM2021-03-04T18:16:01+5:302021-03-04T18:17:31+5:30
शहरातील लसीकरणाचा हा गोंधळ संपणार कधी हा प्रश्न विचारला जात आहे.
पुणे : लसीकरणाच्या गेले काही दिवस सातत्याने सुरु असलेल्या गोंधळात आज आणखी एका गोंधळाची भर पडली आहे. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे वेळ आणि तारीख दिसत नसल्याने अनेक नागरिकांवर आज वाट पाहण्याची वेळ आली. लसीकरण केंद्रावर रांगा लावुन बसल्यानंतरही काही लोकांना लस न घेताच परत जावे लागले. त्यामुळे लसीकरणाचा हा गोंधळ संपणार कधी हा प्रश्न विचारला जात आहे.
लसीकरणासाठी केंद्र सरकारने कोव्हीन ॲप बनवले आहे. या ॲप मध्ये पहिल्या टप्प्यापासुनच अडचणी येत आहेत. नागरिकांना ॲप वापरायला सातत्याने अडचणी येत आहेत. एकीकडे नागरिकांना अडचण येत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही लॅागिन पासुन प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना दररोज करावा लागतोय यामुळे काही केंद्रावर भांडण होण्याचेही प्रकार उद्भवले.
हे सुरळीत होत असतानाच आज पुन्हा नवी तांत्रिक अडचण आली. नोंदणी करुन केंद्रावर आलेल्या नागरिकांची वेळ आणि तारीख कर्मचाऱयांना दिसेना. त्यामुळे अनेकांवर नुसतं वाट पाहत राहण्याची वेळ आली. “ जर असं थांबावं लागत असेल तर वेळ घेवुन येण्याचा उपयोग काय “ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
याविषयी लोकमतशी बोलताना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या ,” तांत्रिक अडचणीबाबत कळल्यास आम्ही ती माहिती ॲपच्या टीमला कळवत आहोत. तसेच नोंदणी अडचणी आल्यास नागरिकांसाठी चार केंद्र सुरु केली आहेत. तिथे थेट जाउन लसीकरण केले जाऊ शकते”.