पावसाळी रोगांपासून पशूंना वाचवण्यासाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:15 AM2021-08-13T04:15:05+5:302021-08-13T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील पशुधन पावसाळी आजारातून वाचवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी फक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील पशुधन पावसाळी आजारातून वाचवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी फक्त १ रुपया खर्च आहे.
पशुसंवर्धन खात्याच्या रोगनियंत्रण विभागाचे उपायुक्त डॉ. देवेंद्र जाधव यांनी ही माहिती दिली. पावसाळ्यात जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. त्यातही जास्त पाऊस झाला, पूर आला तर हे प्रमाण वाढते. फऱ्या, घटसर्प, आन्त्रविषार, काळपुळी, मेंढ्यांची देवी, रेबीज, थायलेरीयासिस, मानमोडी, कोंबड्यांची देवी यांसारख्या आजारांत जनावर दगावून शेतकऱ्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी म्हणून नाममात्र १ रुपया सेवाशुल्क घेऊन हे लसीकरण विनामूल्य करण्यात येत आहे, असे डॉ. जाधव यांंनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी गावांमध्ये शिबिर आयोजित करत आहेत. गाय वर्ग तसेच शेळी, मेंढी व पाळीव कुक्कुट पक्षी यांचेही लसीकरण होईल. पशुधन पालकांनी या शिबिरांमध्ये जाऊन आपल्या जनावराचे लसीकरण करून घ्यावे. पूर आलेल्या ठिकाणी लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. या भागात जनावरांचे साथरोग येऊ नयेत म्हणून पूर्ण काळजी घेण्यात येत असून लसीकरण त्याचाच भाग आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
राज्याच्या २० व्या पशुगणनेप्रमाणे (सन २०१९) राज्यातील पशुधन
गाय वर्ग : १,३९,९२,३०४
म्हैस वर्ग : ५६, ०३,६९२
शेळ्या : १,०६,०४,३८३
मेंढ्या : २,६८,०३२९
कुक्कुट पक्षी : ७,२२,२३,५४४
राज्यातील पशुवैद्यकीय संस्था : ४८४८
फिरती पशुचिकित्सालये : ७३