को-विन अॅपच्या तक्रारीमुळे लसीकरण संथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:40+5:302021-03-04T04:16:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोविन अॅपमधील अनेक तांत्रिक बिघाडांमुळे जिल्ह्यात लसीकरणात अनेक अडथळे येत आहे. अॅप सुरू करताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविन अॅपमधील अनेक तांत्रिक बिघाडांमुळे जिल्ह्यात लसीकरणात अनेक अडथळे येत आहे. अॅप सुरू करताना वारंवार बंद पडणे, सुरूच न होणे, नाव नोंदणी न होणे अशा प्रकारच्या समस्या या अॅपमध्ये येत असल्याच्या तक्रारी लसीकरण सुरू असलेल्या रुग्णालयांनी तसेच नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी केल्या आहेत. याचा परिणाम लसीकरणावर होत आहे. यामुळे या संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने दवाखान्यांचे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या सोबतच केंद्राच्या निकषानुसार लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ३७ खासगी रुग्णालयांची यादीही करण्यात आली आहे.
जिल्ह्यात काेरोनालसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ६० वर्षांपेक्षा जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक तर ४५ ते ५९ पर्यंतच्या सहव्याधी असलेल्यांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या साठी कोविन अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना थेट केंद्रावर जाऊन लस घेता येते. मात्र, कोविन अॅपविषयी अनेक तक्रारी येत आहे. ही यंत्रणा मंगळवारी वारंवार बंद पडली. अनेकदा नागरिक केंद्रावर आल्याने हे अॅप संथगतीने चालत असल्याने नोंदणी करताना अडथळे आले. दुपारनंतर जवळपास अर्धातास ही यंत्रणा बंद पडली होती. तर अनेक केंद्रावर हे अॅप सुरूच होत नव्हते. यामुळे गोंधळाचे वातावरण होते. या अॅपमधील हे दाेष दूर करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जाईल, यानंतर ही यंत्रणा सुरळीत होईल, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. तसेच लसीकरणासाठी निवडण्यात आलेल्या खासगी दवाखान्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
चौकट
केंद्रातर्फे पंतप्रधान आरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना व सीजीएस योजनेंतर्गत लसीकरणासाठी जिल्ह्यातील ३७ दवाखान्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या इच्छेनुसार या दवाखान्यात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. सध्या यापैकी सिम्बायोसिस हॉस्पिटल, मयेकर रुग्णालय, विश्वराज रुग्णालयात हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. खासगी दवाखान्यांची निवड करताना लस साठवण्यासाठी कोल्ड चेन पॉईंट स्टोरेज, ३ खोल्या ज्यांना दोन स्वतंत्रद्वार असतील, लसटोचक, व्हेंटिलेशन आणि लसीकरण झालेल्या रुग्णांची काळजी घेणारी यंत्रणा असे निकष ठेवण्यात आले आहेत.
चौकट
खासगी दवाखान्यात लस घ्यायची आहे तर नोंदणी आवश्यक
जिल्ह्यात खासगी आणि सरकारी केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या ४५ वयापेक्षा जास्त असलेल्यांना लस दिली जात आहे. ज्येष्ठांना सरकारी केंद्रावर जाऊन थेट नोंदणी करता येणार आहे. मात्र, खासगी केंद्रावर लस घ्यायची असेल तर २५० रुपये भरावे लागणार आहे. यासाठी कोविन अॅपवर आधीच नोंदणी करणे बंधनकारक आहे.