शहरातील १३ खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:25+5:302021-03-05T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील १३ खाजगी रूग्णालयांसह ४६ रूग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम सध्या सुरू असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील १३ खाजगी रूग्णालयांसह ४६ रूग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम सध्या सुरू असून, आज दिवसभरातील निश्चित लसीकरणाच्या ९१ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे़ १६ जानेवारीपासून ४ मार्चपर्यंत शहरातील ६२ हजार ७२३ जणांनी लस घेतली आहे़
शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने पुणे शहरातील खाजगी रूग्णालयांनीही पुढाकार घेतला असून, २ मार्चपासून १३ खाजगी रूग्णालयांमध्येही सशुल्क लस उपलब्ध करून देण्यात आली आहे़ तर ५ मार्चपासून यामध्ये आणखी नव्या ८ खाजगी रूग्णालयांची वाढ होणार आहे़ प्रारंभी शहरातील शंभर व शंभरहून अधिक बेड असलेल्या खाजगी रूग्णालयांत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे़ प्रत्येक रूग्णालयास दिवसाला १०० डोस लसीकरणासाठी दिले गेले असून, शासनाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी केलेल्या व्यक्तींना ही लस उपलब्ध होत आहे़
दरम्यान पुणे शहरातील ९४ खाजगी रूग्णालयांमध्ये लस उपलब्ध करून मिळावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ़ मनीषा नाईक यांनी दिली़
----------------------
ॲपवर केंद्राचा ऑप्शन येईना
सध्या अनेक नागरिकांना लस हवी आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्यासमोर लस कशी घ्यायची ? हे प्रश्नचिन्ह आहे. खासगी रूग्णालयात ही सेवा सुरू केल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत आहे. काही नागरिक ॲप द्वारे नोंदणी करत आहेत, पण लस कुठे घ्यायची, त्या केंद्राचा ऑप्शन येत नसल्याच्या तक्रारी आहेत.