मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरणासाठी वशीलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:38+5:302021-09-23T04:11:38+5:30
मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. वशिल्याच्या तट्टूंना तत्काळ ...
मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. वशिल्याच्या तट्टूंना तत्काळ लस दिली जात असून, तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या सामान्य माणसाला लस न घेता रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. वशिला असल्यांना तत्काळ कोविड लसीकरण केले जात असल्याचा आरोप येथील युवा कार्यकर्ते सचिन यादव यांनी केलेला आहे.
कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी सामान्य माणूस रोजगार बुडवून लसीकरणाच्या ठिकाणी तासन्तास रांगेमध्ये ताटकळत उभा राहत आहे. संबंधित व्यक्तींना टोकनही दिले जात आहे. टोकन दिल्यानंतर प्रामाणिकपणे सर्व नागरिक मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर ताटकळत उभे राहत आहेत. मात्र, वशिल्याच्या लोकांना कुठलेही टोकन न घेता प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तत्काळ लसीकरण केले जाते.
वशिल्याच्या तट्टूंसाठी लस संपल्याची घोषणा करून दुपारनंतर ओळखीच्या लोकांना मोबाईलद्वारे बोलावून लसीकरण केले जात असल्याचे गंभीर आरोप यादव यांनी केले आहेत. असे अनेक सर्रास प्रकार या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडत आहेत. सामान्य माणूस रोजगाराअभावी दाहीदिशा करीत आहे. उपलब्ध रोजीरोटीचा असलेला रोजगार बुडवून अनेक ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने येतात. मात्र, येथील वागणूक अन्यायकारक असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पैसे घेऊनही लसीकरण करत असल्याचा त्यांनी गंभीर आरोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेला आहे. यामुळे वरिष्ठांनी याबाबत दखल घेण्याची मागणी सचिन यादव यांनी केली आहे.
...................................................
चौकट : मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पैसे घेऊन लसीकरण केले जात नसून लस ही सर्वसामान्यांसाठी विनामूल्य आहे. यादव यांनी केलेले सर्व आरोप आम्ही नाकारत आहोत. केलेले आरोप चुकीचे आहेत.
अनिल वाघमारे : वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरगाव
................................................