खासगी रुग्णालयांमध्ये १ जूनपासून लसीकरण सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:31+5:302021-05-20T04:12:31+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : लसींचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यास खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण पुन्हा सुरू करणे शक्य होणार आहे. रुग्णालयांनी ...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : लसींचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यास खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण पुन्हा सुरू करणे शक्य होणार आहे. रुग्णालयांनी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. रुग्णालयांना कंपन्यांकडून थेट पुरवठा होणार की सरकारमार्फत होणार, लसींची किंमत याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. सर्व सुरळीत झाल्यास १ जूनपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली. लसींची उपलब्धता वाढल्यावर खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात आली. हजारो नागरिकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे पहिले डोस खासगी रुग्णालयांमध्ये घेतले आहेत. दुसऱ्या डोसचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न रुग्णालयांसमोर आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी खासगी रुग्णालयांमध्ये स्वखर्चाने लस घेण्याची तयारी दर्शवली आहे. केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी होऊन लॉकडाऊनच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लवकरात लवकर लसीकरण सुरू झाल्यास कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांना लस देता येणार आहे.
----
भारत बायोटेक कंपनीने खासगी कंपन्यांना थेट पुरवठा करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलला लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. केअर ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सअंतर्गत येणाऱ्या १४ रुग्णालयांना लसी मिळू शकतील, अशी आशा आहे. कोविन अॅपवरील नोंदणीची खासगी रुग्णालयांची सर्व प्रक्रिया याआधीच पूर्ण झाली आहे. तुम्हाला लसींचा पुरवठा झाल्यास त्याबाबत महापालिकेला माहिती देण्यात यावी आणि त्यानुसार लसीकरण केंद्र कोविन अॅप्लिकेशनवर समाविष्ट केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पुन्हा लसीकरण सुरू होणे सर्वच बाजूंनी लाभदायक ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये लोक घेऊ शकतील. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांवरील ताणही कमी होऊ शकेल.
- डॉ. शैलेश पुणतांबेकर, गॅलेक्सी केअर हॉस्पिटल
-----
लस उत्पादक कंपन्यांकडून खासगी रुग्णालयांना कशा पद्धतीने लसीचे वितरण होणार, याबाबत स्पष्टता नाही. वितरण कंपन्यांकडून शंभर लसी दिल्या जाणार असतील तर त्यातल्या ५० केंद्र सरकारला आणि ५० राज्य सरकार तसेच खासगी रुग्णालयांना मिळून दिल्या जाणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र एका खासगी रुग्णालयाला लसीचे बुकिंग करता येईल का, किती करता येईल याबाबतच्या निर्णयाची अद्याप प्रतीक्षा आहे. लसीबाबतही काही मुद्दे अद्याप निष्कर्षाप्रत आले नाहीत. उदाहरणार्थ कोविशिल्ड लस ६०० रुपयांना केंद्र सरकारला दिली जाणार असेल तर खासगी रुग्णालयांना देताना त्याची परचेस कॉस्ट ६५० इतकी दाखवली जात आहे. पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, वेळेचे व्यवस्थापन या सर्व मुद्द्यांचा विचार करून नेमकी किंमत किती असावी, याबाबत चर्चा सुरू आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण १ जूनपासून सुरळीतपणे सुरू होण्याची शक्यता आहे.
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया