शहरात लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:55+5:302021-04-09T04:11:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील खाजगी लसीकरण केंद्रांवर तथा काही शासकीय लसीकरण केंद्रावरून गुरूवारी अनेकांना लस उपलब्ध नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील खाजगी लसीकरण केंद्रांवर तथा काही शासकीय लसीकरण केंद्रावरून गुरूवारी अनेकांना लस उपलब्ध नसल्याने घरी पाठविण्यात आले़ एकीकडे शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा असताना, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार मात्र लससाठा शिल्लक असल्याचा दावा करीत आहेत़ दरम्यान कुमार यांनी, काही खाजगी लसीकरण केंद्रांकडील लस संपल्याबाबतचे मान्य करीत, त्यांनी महापालिकेकडून लस घेण्याबाबतचे आवाहनही केले आहे़
कुमार यांनी शहरातील लसीकरणाची माहिती देताना, महापालिकेकडे सद्यस्थितीला २५ हजार तर खाजगी रूग्णालयांकडे ४५ हजार लसीचे डोस शिल्लक असल्याचे सांगितले़ आजपर्यंत महापालिकेला ६ लाख लसीचे डोस मिळाले असून, ७ एप्रिलपर्यंत ५ लाख ८ हजार जणांना लस देण्यात आली आहे़ शहरातील १२५ लसीकरण केंद्राव्दारे दिवसाला दहा ते पंधरा हजार लसीकरण केले जात आहे़ १ मार्च पासून १ एप्रिलपर्यंत ३० दिवसात शहरातील ५ लाख जणांना लस दिली गेली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़
दरम्यान शहरात आता केंद्र शासनाच्या धोरणानुसार, एक्सप्रेस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे़ यामध्ये शंभर पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनांच्या ठिकाणाी जाऊन महापालिकेची यंत्रणा ४५ वयापेक्षा अधिकच्या नागरिकांना लस देणार आहे़ याकरिता १५ स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या असल्याची माहिती कुमार यांनी दिली़ तसेच ज्या आस्थापनांमध्ये १०० पेक्षा अधिक कामगार आहेत, त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे़ एक्सप्रेस लसीकरण मोहीमेसाठी भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांनी सहकार्य केले असून, सध्या या दोन्ही संस्था शहरातील चाळीस लसीकरण केंद्रासाठी मदत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले़
--------------------------