राज्य सरकारच्या फसलेल्या नियोजनामुळे लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:46+5:302021-05-11T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकारचा नाकर्तेपणा, लसवाटपाचे फसलेले नियोजन व ठरावीक भागास झुकते माप देण्याच्या राजकारणामुळे राज्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारचा नाकर्तेपणा, लसवाटपाचे फसलेले नियोजन व ठरावीक भागास झुकते माप देण्याच्या राजकारणामुळे राज्यातील जनता लसीकरणापासून वंचित राहात असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या असंख्य केंद्रांवर लस पुरवठ्याचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जात असून, केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्याच्या राजकारणापायी जनतेस मात्र संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारने हे हीन राजकारण थांबवून न्याय्य रीतीने सर्व जिल्ह्यांच्या गरजेनुसार लसपुरवठा करावा व नागरिकांच्या जगण्याचा हक्क जपण्याची जबाबदारी पार पाडावी अशी मागणी शिरोळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या नोंदींनुसार महाराष्ट्रास मिळणाऱ्या लसपुरवठ्यात कोठेही डावे-उजवे केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात ८ मेपर्यंत एक कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १० मे रोजी सकाळपर्यंत केंद्र सरकारकडून एक कोटी ८२ लाख ५२ हजार ४५० मात्रा उपलब्ध झाल्याचे दिसते. १० मे रोजी सकाळपर्यंत सात लाख १८ हजार ५६१ मात्रा राज्याच्या हाती असून, एक लाख १३ हजार ३३० मात्रा महाराष्ट्राच्या वाटेवर आहेत. शिवाय सुमारे दीड लाख मात्रांचा पुरवठा सातत्याने रोज सुरू असतो.
राज्य सरकारच्या नोंदीनुसार दररोज राज्यातील लसीकरणाची संख्या अडीच ते तीन लाख असेल, तर किमान आणखी तीन ते चार दिवस सर्व केंद्रांवर सध्याच्या क्षमतेने लसीकरण सुरळीत होण्यात कोणतीच अडचण नाही, असे शिरोळे म्हणाले.