जून मध्ये लसींचा तुटवडा संपणार : देवेंद्र फडणवीस यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:02 PM2021-05-22T12:02:27+5:302021-05-22T12:55:36+5:30
पुणे महापालिकेचा कामाचे कौतुक
जून नंतर लसींचा उपलब्धतेचा प्रश्न सुटेल असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यामध्ये आज फडणवीस यांचा हस्ते नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट चे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान सध्या सुरू असलेल्या गोंधळावर सर्वांनी मिळून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले आहे.
पुण्यात ऑक्सिजन ची कमतरता जाणवू नये म्हणून नवीन ऑक्सिजन जनरेटींग प्लांट ची निर्मिती करण्यात येत आहे. महापालिका उभारत असलेल्या ८ ऑक्सिजन प्लांट पैकी नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट चे उद्घाटन आज एका ऑनलाईन कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी महापालिकेचा कामाचे कौतुक केले तसेच लसींचा तुटवडा जून महिन्यात संपेल असाही दावा केला. फडणवीस म्हणाले "या लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजन ची कमतरता आपल्याला जाणवली. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी द्यावा लागला. प्रशासनाला तणावात राहावे लागत होते. मोदींनी ऑक्सिजन ची नीट व्यवस्था लावली. प्लांट इम्पोर्ट करणे हा त्यावरचा मार्ग होता. आणि हे केले त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन. पंतप्रधानांचा पुढाकाराने ८०० ऑक्सिजन प्लांट ची निर्मिती होते आहे. या लाटेत सर्वाधिक परिणाम झालेल्या ठिकाणां मध्ये पुणे होतं. पुण्यानी इतका ताण असूनही टेस्टिंग कमी होऊ दिलं नाही. आत्ता संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे. आणि महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लसी उपलब्धतेची परिस्थीती सुधारेल."
चंद्रकांत पाटील ,भाजप प्रदेशाध्यक्ष , म्हणाले " सध्या जो गोंधळ सुरू आहे त्यावरून काही मार्ग काढला पाहिजे. चांगलं काय करता येईल ते पाहिले पाहिजे."
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले," मध्यंतरी ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत होता. आता ऑक्सिजन संपतो का काय अशी भीती जाणवायला लागली. त्यानुसार ८ऑक्सिजन प्लांट शहरात तयार केले आहेत. थेट अमेरिकेतून या ऑक्सिजन प्लांट साठी साहित्य आणले आहे. पुढची लाट आलीच तर महापालिका आत्मनिर्भर होणार आहे."