आदर पूनावाला यांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:04+5:302021-01-17T04:10:04+5:30
पुणे : देशभरात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर जगाला लस पुरवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आदर पूनावाला यांनीही शनिवारी (दि. १६) ...
पुणे : देशभरात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर जगाला लस पुरवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आदर पूनावाला यांनीही शनिवारी (दि. १६) लस टोचून घेतली. स्वत:च्याच कंपनीत तयार झालेली कोविशिल्डच्या लसीकरणाचा व्हिडीओ आणि संदेश त्यांनी ट्विटरवरून ‘शेयर’ केला आहे.
गेले अकरा महिने कोरोनाच्या साथीचा सर्वांनीच नेटाने सामना केला. कोरोनावरील लस कधी येणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अँस्ट्रॉझेनिका कंपनीने विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन आणि वितरणाचे हक्क सिरम कंपनीने मिळवले आहेत. त्याचे उत्पादन पुण्याच्या प्रकल्पात सुरु आहे. या लसीला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर ती आता लसीकरणासाठी देशभर पोहोचवली जात आहे.
तत्पूर्वी कोविशिल्डच्या तीन टप्प्यांमध्ये मानवी चाचण्या पार पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. त्यानंतर कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली. लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाल्यानंतर पूनावाला यांनीही स्वतः लस टोचून घेतली. लस सुरक्षित असल्याचा संदेश त्यांनी या कृतीतून देशाला दिला आहे.
“लसीकरण मोहिमेबद्दल मी संपूर्ण देशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागे अनेकांचे परिश्रम आहेत. या यशाचा मला अभिमान वाटतो. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लसीकरण करून घेत आहे,” या आशयाचे ट्विट आदर पूनावाला यांनी केले आहे.