लस आली, पण देता नाही आली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:29+5:302021-05-20T04:12:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात चार दिवसांपासून ठप्प झालेले लसीकरण बुधवारी पुन्हा सुरू झाले़ सुमारे ७३ लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात चार दिवसांपासून ठप्प झालेले लसीकरण बुधवारी पुन्हा सुरू झाले़ सुमारे ७३ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोसही पोहचले़ परंतु, लस असूनही दोन लसीच्या डोसमधील ८४ दिवसांच्या अंतराच्या नव्या नियमामुळे बहुतांशी लाभार्थ्यांना ती देता आली नाही़ परिणामी आज दिवसभर सर्वच केंद्रांवरील लसीकरण यंत्रणा ठप्प झाली़ त्यामुळे महापालिकेकडे राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या साडेसात हजार कोविशिल्ड लसीच्या डोसपैकी तब्बल ६ हजार ५६५ डोस शिल्लक राहिले आहेत़
पुणे महापालिकेकडून ११९ लसीकरण केंद्रांद्वारे शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण करण्यात येत आहे़ यामध्ये कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींचा समावेश आहे़ राज्य शासनाकडून जशी लस येते, त्यानुसार महापालिका दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे नियोजन करते़ दरम्यान १३ मे रोजी केंद्र शासनाकडून कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ८४ दिवसांनंतरच द्यावा असा आदेश दिला. यामुळे लसीअभावी गेली चार दिवस बंद असलेल्या शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर आज प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले़ परंतु, कोविन पोर्टलवर ४५ वर्षे वयावरील ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी लस घेतली आहे, अशांची नोंद करण्याचा पर्याय खुला होता़ परिणामी आज ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी लसीचा पहिला डोस घेतला त्यांनाच लस देता आली़
---------
राज्य शासनाच्या स्पष्ट सूचना अडथळा
१३ मे रोजी केंद्र शासनाकडून ८४ दिवसांच्या अंतराबाबतचे आलेले आदेश व चार दिवसानंतर लस प्राप्त झाल्यावर राज्य शासनाने लस देताना व्हिडिओ कॉन्स्फरंसिंगव्दारेही लस कोणाला द्यावी याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या़ यामध्ये ९० टक्के लस ही ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनाच दुसरा डोस द्यावा़ आणि १० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंग / स्लॉट बुकिंग केलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाच द्यावी असे स्पष्ट करण्यात आले होते़ यामुळे वॉक इन म्हणजे प्रत्यक्ष दुस-या डोससाठी आलेल्या ४५ वर्षे वयावरील अनेक नागरिकांचे ८४ दिवस हे पहिला डोस घेऊन पूर्ण झाले नव्हते़ परिणामी अनेकांना राज्य शासनाच्या सूचना आड आल्याने परत जाण्याशिवाय आज पर्याय उरला नाही़
----------------------