पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच घेतली नाही लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:22 AM2021-02-21T04:22:16+5:302021-02-21T04:22:16+5:30
पुणे : शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. तरीदेखील अद्याप लसीकरणाचा वेग वाढत नसल्याचे चित्र आहे. पहिल्या ...
पुणे : शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. तरीदेखील अद्याप लसीकरणाचा वेग वाढत नसल्याचे चित्र आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन केले होते. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागच लसीकरणामध्ये पीछाडीवर आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनीही लस घेतली नसल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या टप्प्याची सुरुवात कूर्मगतीने झालेली होती. लसीकरण ऐच्छिक करण्यात आलेले असल्याने लसीकरणाचा आग्रह धरता येत नाही. परंतु, जनजागृती करुन लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासकीय पातळीवर लसीकरणाच्या जनजागृतीबाबत उदासीनता असल्याचे चित्र आहे. आरोग्य सेवकांचे लसीकरण दुसऱ्या टप्प्यातही सुरुच आहे. दुसऱ्या टप्प्यात पालिका, पोलीस, शासकीय कार्यालये, पीएमपी आदी विभागातील अधिकारी कर्मचा-यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. लोकांना लसीवर विश्वास बसावा याकरिता अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी लस घेतली.
मात्र, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या पालिकेचे वरिष्ठ अधिकारी अद्यापही कोरोना लसीपासून दूरच आहेत. यासोबतच ज्यांच्या मार्फत ही लस दिली जाते आहे त्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्यासह विविध रुग्णालयांमध्ये काम करणारे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लस घेतलेली नाही. यातील काही जणांनीच लस घेतल्याची पालिकेचीच आकडेवारी आहे.
पालिकेच्या काही विभाग प्रमुखांनी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी नाव नोंदवून ठेवले आहे. मात्र, लस घेतलेली नसल्याचेही समोर आले आहे.