शहरात व्हॅक्सिन आता मोबाईल व्हॅनवर मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:17+5:302021-05-28T04:09:17+5:30
पुणे : शहरातील अनाथ आश्रम, एचआयव्हीबाधित यांसह मानसिक दृष्ट्या किंवा इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, ...
पुणे : शहरातील अनाथ आश्रम, एचआयव्हीबाधित यांसह मानसिक दृष्ट्या किंवा इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे महापालिकेमार्फत ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम हाती घेतला असून, त्याअंतर्गत गुरुवारी ५ मोबाईल व्हॅनचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ज्या व्यक्ती लसीकरण केंद्रांवर येऊ शकत नाहीत, त्यांचे घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकरिता ५ मोबाईल व्हॅन पहिल्या टप्प्यात सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत़ राज्यात मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम राबविला जाणार आहे़ या उपक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख आशिष भारती आदी उपस्थित होते.
------------
असा असेल ‘व्हॅक्सिन ऑन व्हिल्स’ उपक्रम
व्हॅक्सिन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन उपक्रमाला सीएसआरअंतर्गत जिव्हीका हेल्थकेअर प्रा. लि. आणि माय व्हॅक्सिन या दोन्ही संस्थेचे सहकार्य लाभले असून, त्यांच्या मार्फत हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक मोबाईल व्हॅनमध्ये १ डॉक्टर, २ परिचारिका, १ आरोग्य नोंदणी सहायक, १ आरोग्य समाजसेवक, १ चालक आणि एईएफआय किटसह १ रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे़
-----------------
फोटो मेल केला आहे