खासगी डॉक्टरांनाच मिळेना लस, सामान्यांचा ‘नंबर कब आएगा’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:14+5:302021-02-17T04:16:14+5:30
पुणे : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. एका महिन्यांनंतरही पुण्यातील सुमारे ५००० खासगी डॉक्टर लसीकरणापासून वंचित आहेत. ...
पुणे : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. एका महिन्यांनंतरही पुण्यातील सुमारे ५००० खासगी डॉक्टर लसीकरणापासून वंचित आहेत. ‘कोरोना वॉरियर्स’लाच लस मिळत नसेल, तर सामान्यांचा ‘नंबर कब आएगा’ असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ५० वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असलेल्या सामान्य रुग्णांपर्यंत लस लवकरात लवकर पोहोचल्यास कोरोनाच्या उद्रेकाचा संभाव्य धोका टाळता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकीकडे आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पूर्ण संख्येने लस घेत नसल्याचे चित्र आहे. लसींचे डोस उपलब्ध असताना नोंदणी, नियमावली याबाबतच्या अटी शिथिल करत जास्तीत जास्त लस पोहोचण्याच्या दृष्टीने लसीकरण प्रक्रियेला गती मिळायला हवी, असे मत खासगी डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. मतदानासाठी ज्याप्रमाणे याद्या तयार केल्या जातात, त्याप्रमाणे लसीकरणासाठी प्रक्रिया राबवण्याची मागणी होत आहे.
अॅप्लिकेशनमधील नोंदणीमध्ये बऱ्याच त्रुटी आढळून येत आहेत. शहरातील ३० हजारांहून अधिक सरकारी आणि खाजगी डॉक्टरांनी आणि कर्मचा-यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात, अॅपवर ११ हजार जणांचीच नोंदणी झाल्याचे दाखवले जात आहे. त्रुटी टाळण्यासाठी अॅप्लिेकशनपेक्षा आॅनलाईन नोंदणी प्रकिया राबवावी, असे मत आयएम, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
----------------------------
खाजगी डॉक्टरांना लसीकरणापासून अद्याप शासनाने मागेच ठेवले आहे. लसीकरण न मिळाल्याने गेल्या महिन्याभरात काही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. लसीकरणाचे ‘मास कॅम्पेन’ राबवण्याची सध्या गरज आहे. देशात आजपर्यंत अनेक लसीकरण मोहिमा पार पडल्या आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरणाची योग्य दिशा ठरवून प्रक्रियेला वेग देणे आवश्यक आहे. लसींचे डोस उपलब्ध आहेत आणि लोकही लस घेण्यास उत्सुक आहेत. मात्र, कोविन अॅपमुळे प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. मुंबईमध्ये को-विन अॅपवर पसिसराप्रमाणे वर्गीकरण करण्यात आल्याने प्रक्रियेचे सुलभीकरण झाले आहे.
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडिया, पुणे
----------------------------
लोकांची हालचाल, एकमेकांशी संपर्क वाढल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढणार, याचा अंदाज पूर्वीच बांधला होता. लोकांनी नियमांचे पालन न केल्यास उद्रेक होऊ शकतो. खाजगी रुग्णालयांना बेड उपलब्ध करुन देण्याबाबत नव्याने कल्पना देण्याची गरज आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढवायला हवे. सामान्य लोकांपर्यंत लवकरात लवकर लस पोहोचली पाहिजे.
- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र