तीस वर्षांवरील सर्वांसाठी लस उपलब्ध करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:12+5:302021-03-25T04:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर कोरोनामुक्त करण्यासाठी तीस वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर कोरोनामुक्त करण्यासाठी तीस वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शहरातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केली आहे. यासाठी खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष व शहरातील आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, मुक्ता टिळक व सुनील कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
पुणे कोरोनामुक्त करण्याचा आमचा संकल्प असून त्यात यश आल्यास साऱ्या देशवासीयांनाच यातून दिलासा मिळेल, असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
“पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून पूर्वेकडचे ऑक्सफर्ड अशी पुण्याची ओळख आहे. येथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून, कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथील शैक्षणिक संस्था बंद होत्या. अलीकडेच त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या, पण साथीचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा त्या बंद कराव्या लागल्या आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शिक्षण व्यवस्थेवर झालेला आहे. पुणे हे महाराष्ट्रातील आर्थिक केंद्र आहे. मात्र, कोरोनाच्या लाटेमुळे येथील व्यापार-उद्योगावर वारंवार निर्बंध येत असल्याने अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला असून, त्याचा परिणाम पुण्याभोवतालच्या छोट्या गावांमध्ये आणि शहरांवरही झालेला आहे. कोरोनावरली नियंत्रणासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून अडीच लाख नागरिकांनाच लस देण्यात आली आहे. हा वेग साथ नियंत्रणाच्या दृष्टीने कमी आहे. नागरिकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती निर्माण व्हावी यासाठी तीस वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण व्हावे, याकरिता आपण त्वरित निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे़
----------------------