पुण्यातही मिळणार खासगी रुग्णालयांमध्ये लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:19 AM2021-02-28T04:19:55+5:302021-02-28T04:19:55+5:30
पुणे : केंद्र शासनाने १ मार्चपासून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुण्यातही ही लस ...
पुणे : केंद्र शासनाने १ मार्चपासून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुण्यातही ही लस आता उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनाने नुकतीच ६० वर्षांपुढील आणि ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. या लसीसाठी रुग्णालयांना २५० रुपये दर आकारण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यातील १५० रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. या लसीकरणाबाबतची अगदी जुजबी माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली असून अद्याप कोणत्याही मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालिकेकडून ४२ रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वीच्या आठ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे दिवसाला पाच हजार लस मोफत देण्याचे नियोजन करण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले. याठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हीटीसोबतच अन्य तयारी सुरू करण्यात आली आहे.
====
शनिवार, रविवार लसीकरण तूर्त बंद
लसीकरणासाठी तयार करण्यात आलेली ‘को-विन’ प्रणाली अद्ययावत (व्हर्जन २.०) करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे केंद्र शासनाने शनिवार आणि सोमवारचे लसीकरण थांबविले आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्यांचे लसीकरण रद्द करण्यात आले आहे. मुळातच या प्रणालीमध्ये दोष असल्याने अनेक अडचणी उद्भवत होत्या. नवीन प्रणालीमध्ये आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. तब्बल ३० हजार आरोग्य सेवकांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे याबाबत नेमक्या मार्गदर्शक सूचना न मिळाल्यास पुन्हा अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.