‘वडापाव’ पडला ८ लाखांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:26+5:302021-08-27T04:15:26+5:30
पुणे : घरी जात असताना वाटेत वडापाव घेण्यासाठी थांबणे एका महिलेला तब्बल ८ लाख रुपयांना पडले. ही घटना सातारा ...
पुणे : घरी जात असताना वाटेत वडापाव घेण्यासाठी थांबणे एका महिलेला तब्बल ८ लाख रुपयांना पडले. ही घटना सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकात बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता घडली.
याप्रकरणी एका ३५ वर्षांच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कारने घरी जात होत्या. त्यांच्याबरोबर त्यांची वहिनी होती.
अहिल्यादेवी चौकात संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका चहाच्या दुकानाजवळ त्यांनी कार थांबविली. त्यांची वहिनी कारमधून उतरून दुकानात वडापाव घेण्यासाठी गेल्या. फिर्यादी या कारमध्येच बसून होत्या. तितक्यात एकाने त्यांना खाली पैसे पडल्याचे सांगितले. पण, सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा आणखी दोघांनी तसेच सांगितल्यावर त्यांनी गाडीतूनच त्याकडे पाहिल्याने त्याच काही क्षणात चोरट्याने डाव्या सीटवर असलेल्या त्यांची पर्स चोरून नेली. पर्समध्ये ८ तोळे वजनाचे दागिने व १० हजार रुपये राेख असा ८ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज होता.
त्यांची वहिनी वडापाव घेऊन गाडी येऊन बसल्यावर त्या घरी गेल्या. घरी गेल्यावर आपली पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा येऊन शोधाशोध केली. सहकारनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. अंगावर घाण पडली, पैसे पडले असा बहाणा करून चोरी करणाऱ्या टोळीपैकी काही जण त्यांच्या कारच्या आजूबाजूला फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे अधिक तपास करीत आहेत.