वढू बुद्रुकला कडेकोठ पोलीस बंदोबस्त, २७ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 02:55 AM2017-12-31T02:55:37+5:302017-12-31T02:55:50+5:30
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यावरून...
कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीही ७ जणांसह इतर २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली होती.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रमाकांत विठ्ठल शिवले (वय ४०, रा. वढू बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. २९) सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी कोणीतरी संभाजीमहाराज यांच्याविषयी लिहिलेला फ्लेक्स चिकटवला होता. हा फलक गावातील काही व्यक्तींनी वाचल्यानंतर काढून टाकला.
या कारणावरून संदीप शंकर गायकवाड, सनी कांबळे, अशोक ऊर्फ पांडा बाळू गायकवाड, बळीराम गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, संदीप शंकर गायकवाड, शैलेश शंकर गायकवाड (सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) व इतर १० ते १५ महिलांनी बेकायदा जमाव गोळा करून फिर्यादीसह सरपंच व इतर ग्रामस्थांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वरील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले करत आहेत.
दरम्यान, पोलीस हवालदार पुनाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वढू बुद्रुक येथे तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २९) रात्री संभाजीमहाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेल्या मोकळ्या जागेत दौंडचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांची सरकारी गाडी उभी केली होती.
या वेळी स्वप्निल गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, सनी कांबळे, शैलेश गायकवाड व इतर १५ ते २० जणांनी जमाव जमा करीत आरडाओरडा केला. तसेच पोलीस पथकाच्या दिशेने स्वप्निल गायकवाड याने दगड फेकला.
यामध्ये उपविभागीय अधिकाºयांच्या गाडीची काच फुटली. आरोपींनी घोषणाबाजी करीत पोलिसांच्या कामात अडथळा आणला व गाडी फोडली, म्हणून पोलिसांनी वरील आरोपींच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.
शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंद
गोविंद गोपाळ यांच्या समाधीवरील छत व माहितीफलक काढल्याप्रकरणी शुक्रवारी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील ४९ पैकी ९ जणांना अटक करण्यात आली. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, राजेंद्र कुंटे, अमर वाघमोडे यांनी केले. दरम्यान, वढू बुद्रुक येथे शिक्रापूर, शिरूर व रांजणगाव पोलिसांसह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथक गावामध्ये तैनात करण्यात आले आहे.