पंतप्रधान माेदींना भेटलेली वैशाली उपचाराच्या प्रतीक्षेत; रूबी हाॅल क्लिनिकला आश्वासनाचा विसर
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 22, 2022 08:05 PM2022-08-22T20:05:15+5:302022-08-22T20:05:32+5:30
कुटुंबीयांनी केले मदतीचे आवाहन
पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दखल घेतल्यानंतर रूबी हाॅल क्लिनिक हाॅस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेल्या हडपसर येथील वैशाली यादवची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ती आजारी असून, तिला अशक्तपणा आला आहे. डाॅक्टरांनी तिला माेठ्या तपासण्या करायला सांगितल्या आहेत. तिचे वडील पेंटिंग काम करतात. सध्या कामही मिळत नसल्याने हे कुटुंब आर्थिक विवंचनेत आहे. मदतीचे आवाहन केले आहे.
हडपसर पाॅवर हाऊस येथे राहणाऱ्या वैशालीला लाखाे रुपयांच्या खर्चाअभावी वैशालीची हृदयशस्त्रक्रिया पुण्यात काेणत्याही हाॅस्पिटलने केली नव्हती. त्यावेळी तिने थेट पंतप्रधान माेदी यांना पत्र लिहिल्यानंतर त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली अन् येथील तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ‘रूबी’ला आदेश देत तिची हृदय शस्त्रक्रिया २०१६ ला करून घेतली हाेती. त्यानंतर वैशाली व कुटुंबीयांना पंतप्रधान माेदी यांनी भेट दिली हाेती.
रूबी हाॅल क्लिनिकचे प्रमुख परवेज ग्रॅंट यांनी तिच्या शाळेच्या खर्चाची व पुढे लागणाऱ्या आराेग्याच्या खर्चाचा भार उचलण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र, त्याचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे वैशाली स्वत:च्या उपचारांसाठी हतबल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी हे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची घाेषणा देतात. तसेच त्यांच्या समाजमाध्यमांवरील हॅंडलवरूनही ते वैशालीसाेबतचा फाेटाे टाकतात. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे.
हाताला काम नाही अन् खिशात पैसा
वैशालीचे चुलते प्रताप यादव म्हणाले, ‘‘वैशाली यादव ही गेल्या आठ दिवसांपासून आजारी आहे. तिला अशक्तपणा, ताप, उलट्या व धाप लागत आहे. डाेळ्याखाली काळी वर्तुळे पडली आहेत. स्थानिक डाॅक्टर तिला माेठ्या तपासण्या करायला सांगत आहेत. त्यासाठी २० ते २५ हजार रुपये खर्च लागणार आहे. मात्र, पेंटिंगचे काम करून घर चालविणाऱ्या आम्हा यादव कुटुंबीयांना हा खर्चाचा भार पेलत नाही. तसेच अनेक दिवसांपासून कामही मिळत नसल्याने परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मदतीचा हात द्यावा.’’