आरक्षणामुळे महिला आव्हाने पेलण्यास सक्षम : वैशाली नागवडे
By admin | Published: March 25, 2017 03:38 AM2017-03-25T03:38:50+5:302017-03-25T03:38:50+5:30
‘ जागतिक पातळीवर महिला दिन हा आठ मार्च म्हणून साजरा केला जात असला, तरी आपल्याकडे प्रत्येक घरात महिलाराज केव्हाच आले आहे.
नीरा : ‘ जागतिक पातळीवर महिला दिन हा आठ मार्च म्हणून साजरा केला जात असला, तरी आपल्याकडे प्रत्येक घरात महिलाराज केव्हाच आले आहे. पुरुषप्रधान संस्कृती असली, तरी घरातील सर्व जबाबदाऱ्या महिला उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसत आहेत. महिला आरक्षणामुळे घराबाहेरील आव्हानेही आता महिला सक्षमपणे पेलताना दिसत आहेत,’ असे प्रतिपादन जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी व्यक्त केले.
नीरा (ता. पुरंदर) येथील नीरामाई महिला मंडळाच्या वतीने बुधवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात नागवडे बोलत होत्या. यावेळी सिनेअभिनेत्री स्मिता ओक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, नीरेच्या सरपंच दिव्या पवार, माजी सरपंच सुहासिनी चव्हाण, मंडळाच्या अध्यक्षा व माजी महिला बालकल्याण सभापती रेखाताई चव्हाण यांसह मंडळातील सर्व सदस्या उपस्थित होत्या.
नीरेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. नलिनी विजयकुमार शहा आदर्श माता, संजीवनी खंडेराव निकम आदर्श शिक्षिका, डॉ.रोहिणी संदीप मदने आदर्श वैद्यकीय सेवा, संगीता काशिनाथ पवार आदर्श महिला, शांताबाई बबनराव झगडे आदर्श लघूउद्योजिका, वैजयंती सुरेश जेधे यांना आदर्श गृहिणी पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार देताना प्रत्येक महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. मंडळातील सदस्यांपैकी चंदा लाहोटी व मीना निगडे यांना बेस्ट आॅफ ग्रुप म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी करमणुकीसाठी ‘नजराणा हास्याचा’ हा स्मिता ओक व दिलीप हल्याळ यांच्या द्विपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती रेखा चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन तनुजा शहा यांनी केले, तर नेहा शहा यांनी आभार मानले.